थोरबोले बोलू, खाऊ लागले; लवकरच डिस्चार्ज
By Admin | Updated: May 26, 2014 02:11 IST2014-05-26T02:11:19+5:302014-05-26T02:11:19+5:30
शिवसेना आणि मनसे राड्यात गंभीर जखमी झालेले पोलीस शिपाई विकास थोरबोले यांची प्रकृती सुधारली असून, आता ते बोलू आणि खाऊ लागले आहेत

थोरबोले बोलू, खाऊ लागले; लवकरच डिस्चार्ज
मुंबई : शिवसेना आणि मनसे राड्यात गंभीर जखमी झालेले पोलीस शिपाई विकास थोरबोले यांची प्रकृती सुधारली असून, आता ते बोलू आणि खाऊ लागले आहेत. पुढच्या दोनच दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती जॉय रुग्णालयाचे संचालक डॉ. रॉय पाटणकर यांनी दिली. २४ एप्रिल रोजी झालेल्या हाणामारीमध्ये थोरबोले यांची अन्न आणि श्वसननलिका कापली गेली होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. २८ दिवसांनंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे. यादरम्यान त्यांच्यावर एकूण तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अन्न आणि श्वसननलिका जोडण्यासाठी त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सर्व शस्त्रक्रिया करून झाल्यावर दोनदा सीटी स्कॅन आणि एण्डोस्कोपी करून त्यांच्या श्वसन आणि अन्ननलिकेची तपासणी करण्यात आली होती. यानंतरच त्यांना द्रवरूप अन्न द्यायला सुरुवात केली. दोन दिवस द्रवरूप अन्न घेतल्यावर त्यांना कोणताही त्रास झाला नाही. मग त्यांना शनिवारी शिरादेखील खायला दिला. तरीही त्यांना कोणताही त्रास झालेला नाही. थोरबोले आता थोडं थोडं बोलायला लागले आहेत. अजूनही त्यांचा आवाज स्पष्ट येत नाही. त्यांना स्पीच थेरपी द्यायला सुरुवात केली आहे, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)