वाळीत टाकल्याप्रकरणी तीस जणांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 21, 2014 02:33 IST2014-11-21T02:33:19+5:302014-11-21T02:33:19+5:30
मुंबईतील खोली गावकीच्या नावावर करण्यासाठी दबाव आणून वृद्ध दाम्पत्याला वाळीत टाकण्याचा प्रकार महाड तालुक्यात उघडकीस आला.

वाळीत टाकल्याप्रकरणी तीस जणांवर गुन्हा दाखल
महाड : मुंबईतील खोली गावकीच्या नावावर करण्यासाठी दबाव आणून वृद्ध दाम्पत्याला वाळीत टाकण्याचा प्रकार महाड तालुक्यात उघडकीस आला. तालुक्यातील खैरांडेवाडी (तेलंगे) या गावातील शिवराम वनगुले यांना वाळीत टाकल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
तेलंगे खैरांडेवाडी येथील शिवराम महादेव वनगुले यांच्या मालकीची मुुंबईत दादरच्या दादासाहेब फाळके मार्गावर शिवनेरी इमारतीत खोली आहे. गिरणी बंद पडल्याने रोजगार संपलेल्या वनगले हे गावाकडे राहावयास आले होते. त्या काळात बंद असलेली खोली मुंबईत नोकरी करणाऱ्या गावकऱ्यांना राहण्यासाठी देण्याची विनंती केली होती. वनगले यांनी गावकऱ्यांची ही विनंती मान्य करून त्यांना ती राहण्यास दिली.
२००९मध्ये यापैकी काही गावकऱ्यांनी ग्रामस्थ मंडळ नोंदणीकृत करायचे आहे, असे सांगून एका स्टॅम्प पेपरवर वनगुले यांची सही घेतली. मात्र सदरची खोली ग्रामस्थ मंडळाच्या नावावर करण्याचा त्या गावकऱ्यांचा हेतू नंतर वनगुले यांच्या लक्षात आला. त्या वेळी माझी खोली मला परत करा, असे त्यांनी सांगितले. तेव्हा तुम्ही ही खोली मंडळाच्या नावावर करण्यास नाहरकत प्रमाणपत्र दाखवले आणि त्यासाठी आणखी सह्या करा यासाठी गावकऱ्यांनी शिवराम वनगुले यांच्यावर दबाव आणला. तसेच खोली गावकीच्या मंडळाच्या नावावर करण्यास नकार देणाऱ्या वनगुले यांना गावकीने १ लाख रुपयांचा दंड ठोठावून त्या कुटुंबाला वाळीत
टाकले. (प्रतिनिधी)