मुंबई : शहरातील रस्त्यांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सहा कंत्राटदारापैकी दोघांना तेराशे कोटींची नवीन कामे दिल्याप्रकरणी मुंबई महापालिका अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्त एम. एल. टाहिलियानी यांनी दिले आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिलगलगली यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांनी याबाबत चौकशी सुरु केली आहे. रस्त्याच्या कामातील भष्ट्राचार व गैरव्यवहाराप्रकरणी पालिकेने सहा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्ट आणि जे. कुमार यांना हँकॉकसह यारी रोड, मिठी नदी आणि विक्रोळी उड्डाणपूलाचे नवीन कंत्राट देण्यात आले. तसेच गोरेगाव-मुलुंड लिंक रोड ही १३०० कोटींची कामे देण्यामागील प्रशासनाचा हेतूबाबत संशय निर्माण होतो, त्यामागे भ्रष्ट अधिकारी-लोकप्रतिनिधींची साखळी असण्याची शक्यता गलगली यांनी वर्तविली होती. त्यांच्या मागणीनुसार लोकायुक्तांनी पालिकेकडून त्याबाबत अहवाल मागविला असून चौकशी सुरू केली असल्याचे गलगली यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तेराशे कोटींच्या कंत्राटांची चौकशी
By admin | Updated: June 10, 2016 05:07 IST