आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस
By Admin | Updated: September 3, 2015 01:29 IST2015-09-03T01:29:16+5:302015-09-03T01:29:16+5:30
आदिवासी वसतिगृहातील ३०९ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ खांदा कॉलनी येथील शासकीय वसतिगृहात ३१ आॅगस्टपासून छेडलेले आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरू असून,

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस
पनवेल : आदिवासी वसतिगृहातील ३०९ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ खांदा कॉलनी येथील शासकीय वसतिगृहात ३१ आॅगस्टपासून छेडलेले आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरू असून, या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांपैकी सहा जणांची प्रकृती ढासळली आहे. या विद्यार्थ्यांना पनवेल ग्रामीण रुग्णालय, जे. जे . रुग्णालय, केईएम रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
मागील महिन्यात आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी पेण प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी कार्यालयीन सामानाची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांनी खांदा कॉलनी येथील ९ विद्यार्थ्यांसह एकूण ३०० विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले होते. या कारवाईच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण छेडले आहे.
या आंदोलनाला श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांनी पाठिंबा दिला आहे. मंगळवारी त्यांनी खांदा कॉलनी येथील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. बुधवारी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना विविध ठिकाणी उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
सुनील तोटावड, योगेश बहिरम, दादाभाऊ धिंदळे, किसन वाघ, बाळासाहेब पांढरे, गुरुनाथ म्हसे या सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी पनवेल नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते संदीप पाटील, शेकाप नेते जे. एम. म्हात्रे, नारायण घरत, काशिनाथ पाटील, रमेश पाटील आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)