बिबट्याचे कातडे तस्करी प्रकरणात तिसरा आरोपी गजाआड
By Admin | Updated: September 3, 2014 01:12 IST2014-09-03T01:12:49+5:302014-09-03T01:12:49+5:30
वरुड वनपरिक्षेत्रात ३१ आॅगस्ट रोजी वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून बिबट्याच्या कातडाची तस्करी प्रकरणीदोघांना सिनेस्टाईल पकडून बिबट्याचे कातडे जप्त केले. यातील पसार तिसऱ्या आरोपीला जलालखेडा येथून

बिबट्याचे कातडे तस्करी प्रकरणात तिसरा आरोपी गजाआड
वरुड वनपरिक्षेत्रातील घटना : आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी
संजय खासबागे - वरुड
वरुड वनपरिक्षेत्रात ३१ आॅगस्ट रोजी वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून बिबट्याच्या कातडाची तस्करी प्रकरणीदोघांना सिनेस्टाईल पकडून बिबट्याचे कातडे जप्त केले. यातील पसार तिसऱ्या आरोपीला जलालखेडा येथून सोमवारच्या रात्री अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी दिली आहे.
वरुड तालुक्यात मध्यप्रदेश सीमेवर मोठे जंगल आहे. या जंगलात अनेकदा नागरिकांना वाघांचे दर्शन घडते. गत वर्षी पांढऱ्या पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला तर काही दिवसांपूर्वी एका बिबट्याचा जामगाव (महेंद्री) तलावावर मृत्यू झाला. या घटनेची शाही सुकत नाही तोच पुन्हा वाघाच्या कातड्याची तस्करी करणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे गत एक महिन्यांपासून तस्करांचा शोध सुरु होता. यासाठी बनावट ग्राहक म्हणून कागदी नोट घेऊन सापळा रचण्यात आला होता. कातडे खरेदी करण्यासाठी या तस्कारांसोबत ९० लाखांचा सौदा वनविभागाने बनावट ग्राहक पाठवून केला होता. हा सौदा निश्चित झाल्यानंतर ३१ आॅगस्ट रोजी सकाळपासून वरुड ते आमनेरपर्यंत मार्गावर साध्या वेशात वनकर्मचारी तैनात होते. वनपाल अमोल चौधरी, वनरक्षक आशीष चक्रवर्ती, डि.एच. वाळके, भारत अळसपुरे, विशाल अंबागडे, इंद्रजित बारस्कर, एम.एस. राऊत, डी.जी. राऊत, ए.डी. खेडकर, वर्षा हरणे व घुमाळे यांनी खासगी वाहन घेऊन बिबट्याच्या कातडाची तस्करी करणाऱ्यांच्या वाहनाचा काटोलपासून पाठलाग केला. सापळा रचून बनावट व्यापारी बनून ते गेले आणि टोळीतील दोन आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून बिबट्याचे कातडे जप्त केले.
बाजारभावाप्रमाणे या कातड्याची किंमत दीड लाख रुपये असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. आरोपींनी वापरलेली मारुती व्हॅन क्र. एम.एच.४०-के.आर. १०६७ जप्त करण्यात आली आहे. सदर बिबट हा अडीच फूट उंचीचा असल्याचा अंदाज आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये काटोल येथील फिरोज शहा बब्बू शहा (३१, रा. बुधवारपेठ काटोल), दिनेश गजानन बेलखेडे (२४, रा. लाडगाव ता. काटोल) या दोघांचा समावेश होता.
वन विभागाच्या पथकाने पसार झालेला तिसरा आरोपी प्रशांत उर्फ गोलू नांदेकर (३१) याला जलालखेडा येथून सोमवारी रात्री अटक केली. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक संजय गौड यांच्या मार्गदर्शनात उपवनसरंक्षक निनू सोमराज, दक्षता पथकाचे उपवनसरंक्षक सी.टी. मोरणकर, अनंत गावंडे, परतवाड्याचे हरिश्चंद्र पडगव्हाणकर आणि मोर्शीचे वनाधिकारी अशोक कविटकर, संजय बनसोड आदींनी संयुक्तरीत्या केली.