रेल्वेचा कारभार सुधारण्याच्या तुता-या म्हणजे गाजराचीच पुंगी - उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 07:23 IST2016-12-31T07:17:11+5:302016-12-31T07:23:34+5:30
उपनगरी रेल्वे सेवेचा कारभार सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर फुंकल्या जाणा-या तुता-या म्हणजे गाजराचीच पुंगी ठरल्या आहेत, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून सोडले आहे.

रेल्वेचा कारभार सुधारण्याच्या तुता-या म्हणजे गाजराचीच पुंगी - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मध्य रेल्वेवर झालेल्या अपघातावरुन सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गुरुवारी कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलचे पाच डबे घसरल्याने मध्य रेल्वेच्या सेवेचा बोजवारा उडाला होता. यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. याचा दाखला देत 'उपनगरी रेल्वे सेवेचा कारभार सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर फुंकल्या जाणा-या तुता-या म्हणजे गाजराचीच पुंगी ठरल्या आहेत', असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून सोडले आहे.
लोकल वाहतुकीचा गोंधळ
''लोकल वाहतुकीचा गोंधळ उपनगरी रेल्वे सेवेचा कारभार सुधारण्याच्या तुतार्या रेल्वेच्या प्रत्येक कार्यक्रमात फुंकल्या जातात. मात्र वारंवार होणारे अपघात, डबे घसरण्याच्या घटना यामुळे सध्या तरी या तुतार्या म्हणजे गाजराचीच पुंगी ठरल्या आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 'गुरुवारी विठ्ठलवाडी स्थानकाजवळ भल्या पहाटे लोकलचे पाच डबे रुळावरून घसरले आणि मध्य रेल्वेचे नेहमीप्रमाणे तीन तेरा वाजले. भल्या सकाळीच हा प्रकार घडल्याने नोकरीवर जाणार्या लाखो प्रवाशांचेही वेळापत्रक लटकले. या लोकल अपघातात कोणी जखमी वा मृत झाले नाही हे सुर्दैव असले तरी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे ‘दुर्दैव’ काही टळले नाही'', असेही उद्धव म्हणाले आहेत.
''तब्बल अकरा तास ‘लोकलहाल’ सहन करण्याची वेळ चाकरमान्यांवर आली. एकदम पाच डबे घसरल्याने रुळांचे तसेच स्लीपर्सचे नुकसान झाले, म्हणून हा जास्त वेळ दुरुस्तीसाठी लागला, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. ते खरेही असेल; पण अनेकांना त्यामुळे कामावरच जाता आले नाही, अनेकांना प्रचंड हालअपेष्टा सहन करीत उशिरा कामाचे ठिकाण गाठावे लागले त्याचे समर्थन कसे होणार?'', असा प्रश्न उद्धव यांनी संपादकीयाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
''उपनगरी रेल्वे, त्यातील प्रचंड गर्दी, वारंवार विस्कळीत होणारी वाहतूक, त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल या मुंबईकरांसाठी अनपेक्षित घटना नाहीत. मध्य रेल्वेचा गोंधळ प्रवाशांच्या अंगवळणी पडला आहे. वास्तविक ज्या भागात गुरुवारी रुळावरून डबे घसरले त्या रेल्वे मार्गाची तपासणी २२ नोव्हेंबरला करण्यात आली होती. अल्ट्रासॉनिक पद्धतीने तपासणी करून रुळांना भेगा पडल्या आहेत का, तडे गेले आहेत का हे पाहिले जाते. तरीही गुरुवारचा अपघात घडलाच. अपघात ठरवून होत नाही हे मान्य केले तरी लोकल अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. ते कधी कमी होईल हे कोणीच सांगू शकत नाही. उपनगरी रेल्वे सेवा सुधारण्याच्या घोषणा कशा पोकळ आहेत यावरच गुरुवारच्या ‘लोकल घसरणी’ने शिक्कामोर्तब केले आहे. मध्य रेल्वेच्या कारभाराचा तमाशा आणि लोकल वाहतुकीचा गोंधळ हा मागील पानावरून पुढे सुरू राहणार असाच त्याचा अर्थ. तो सहन करीत आला दिवस ढकलण्याशिवाय मुंबईकरांकडे दुसरा पर्याय तरी कुठे आहे?, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सरकारला टोला हाणला आहे.