त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांची लुटमार

By Admin | Updated: June 11, 2014 01:43 IST2014-06-11T01:43:00+5:302014-06-11T01:43:00+5:30

त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी एकच हल्लाबोल केला. प्रवासी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी ए-१, बी-१, एस-४, एस-९ या कोचमध्ये अक्षरश: लूट माजवली.

Thieves robbed in Trivandrum-Korba Express | त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांची लुटमार

त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांची लुटमार

३५ प्रवाशांचा १ कोटींचा मुद्देमाल पळविला : नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांचा गोंधळ
नागपूर : त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी एकच हल्लाबोल केला. प्रवासी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी ए-१, बी-१, एस-४, एस-९ या कोचमध्ये अक्षरश: लूट माजवली. यात ३० ते ३५ प्रवाशांचे दागिने, महागडे साहित्य, कपडे अशा एकूण १ कोटी रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला.
सकाळी विजयवाडा रेल्वेस्थानकावर प्रवासी झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना साहित्य चोरीला गेल्याचे कळताच त्यांच्यात खळबळ उडाली. त्यामुळे ही गाडी नागपुरात तब्बल दीड तास उशिराने पोहोचली. प्रवाशांनी गोंधळ घालू नये यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यात कुठलातरी स्प्रे मारून चोरट्यांनी ही लुटमार केल्याची माहिती प्रवाशांनी दिली. त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेस ही गाडी रात्री ११.१५ वाजता मद्रास रेल्वेस्थानकावरून सुटली. मद्रासवरून गाडी सुटताना सर्व प्रवाशांचे साहित्य जशास तसे होते. यात ए-१, बी-१ या कोचमध्ये ३० ते ४० वेटिंगवर असलेले प्रवासी बसून होते. शंका आल्यामुळे काही प्रवाशांनी त्यांना बाहेर काढण्याची मागणी केली. परंतु गाडीतील टीटीईने तुम्हाला काय करायचे अशी प्रवाशांची दमदाटी केली. थोड्या वेळाने सर्व प्रवासी झोपी गेले. त्यानंतर रात्रभर चोरट्यांनी आपल्या कारवाया सुरू ठेवून ३५ ते ४० प्रवाशांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप, महागडे मोबाईल असा एकूण १ कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सकाळी ६ वाजता त्रिवेंद्रम-कोरबा एक्स्प्रेस विजयवाडा रेल्वेस्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना आपले साहित्य चोरीला गेल्याचे कळताच त्यांनी एकच गोंधळ घातला. त्यानंतर रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक रेल्वेस्थानकात प्रवाशांनी पोलिसात तक्रार देणे सुरू केले. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर दुपारी ४.४० वाजता येते. परंतु चोरीच्या घटनेमुळे ही गाडी तब्बल दीड तास उशिराने सायंकाळी ६ वाजता प्लॅटफार्म क्रमांक सहावर आली.

प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर गोंधळ घालू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त चौधरी, निरीक्षक कल्याण मोरे, आर. एन. सिंग, लोहमार्ग पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडीतून उतरल्यानंतर संतप्त प्रवाशांनी पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना आपली कैफियत सांगितली. सायंकाळी ६.२० वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
प्रवाशांची कैफियत
या गाडीच्या ए-१ कोच, बर्थ २७, २८ वरून प्रवास करणारे टेटस टोनी (४०) रा. भिलाई या प्रवाशाने आपले ५ लाखाचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती दिली. एस-९ कोचमधून बर्थ क्रमांक ५०, ५२, वरून प्रवास करणारे रामचंद्र मुदलीयार (५३) रा. कोरबा यांच्या पत्नीचे दोन महागडे सोन्याचे नेकलेस, मंगळसूत्र, कानातले टॉप्स, १.६५ लाख रुपये रोख आणि मुलाच्या शिक्षणासाठी काढलेला १.५५ लाखाचा डिमांड ड्राफ्ट असा एकूण ४ लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. बी-१ कोचच्या बर्थ क्रमांक ५८, ५९, ६१, ६७ वरून प्रवास करणारे के. संतोषकुमार यांचेही १.५० लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केला. बी-१ कोचमधून प्रवास करणारे सीताराम पिल्ले यांचेही सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ७ लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. (प्रतिनिधी)

Web Title: Thieves robbed in Trivandrum-Korba Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.