चोर्या दोन, गुन्हा मात्र एकच
By Admin | Updated: July 26, 2014 20:54 IST2014-07-26T20:54:41+5:302014-07-26T20:54:41+5:30
गुन्हय़ांची संख्या कमी करण्यासाठी पोलिसांचा केविलवाणा प्रकार

चोर्या दोन, गुन्हा मात्र एकच
अकोला: शहरातील गुंडगिरी, चोर्या, घरफोडीसारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिस ठोस उपाययोजना करीत नाहीत. मात्र गुन्हय़ांची संख्या कमी करण्यासाठी पोलिस वेगवेगळय़ा प्रकारचे प्रयत्न करतात. असा एक प्रयत्न शुक्रवारी खदान पोलिसांनी केला. मलकापूर भागात दोन घरी घरफोड्या झाल्या. या दोन्ही घरमालकांनी पोलिस ठाण्यात वेगवेगळी तक्रार दिली. त्यानुसार दोन गुन्हे दाखल व्हायला हवे होते. परंतु खदान पोलिसांनी गुन्हय़ांची वाढू नये यासाठी दोन्ही घरांमधील घरफोडीप्रकरणी एकच गुन्हा दाखल करून विषय एकाच कागदात निपटून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
शहरातील वाढती गुन्हेगारी, प्राणघातक हल्ले, चोर्या, घरफोड्यासारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिस कोणतीच उपाययोजना करीत नाही. रात्रीला गस्त घालण्याच्या नावाने नुसती बोंब असते. गस्तीच्या नावावर पोलिस ठाण्यात येऊन झोपा काढण्याचे काम पोलिसांकडून होत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा करून गुन्हेगारीला आळा घातला पाहिजे. परंतु हा प्रयत्न करायचा सोडून भलताच प्रयत्न करताना दिसतात. शहरात अनेक घटना घडतात. परंतु आपल्या ठाण्यात दाखल होणार्या गुन्हय़ांची संख्या वाढू नये यासाठी पोलिस दोन घटनांचा एकच गुन्हा दाखल करतात. मलकापूर भागातील सुरेका नगरात राहणार्या इंदूबाई बंडू खपाडे (४७) यांच्याकडे २३ ते २४ जुलैदरम्यान रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दाराचे कडीकोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला व स्टीलच्या डब्यातील रोख २५ हजार रुपये काढून घेतले आणि त्यानंतर चोरट्यांनी खपाडे यांच्या शेजारी राहणार्या शिल्पा पांडे यांच्या घराकडे मोर्चा वळवून त्यांच्या घरातील दाराचे कडीकोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील सोने, चांदीचे दागिने व रोख १0 हजार रुपये असा ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या दोघी तक्रारदारांनी शुक्रवारी खदान पोलिस ठाण्यात धाव घेऊन वेगवेगळी तक्रार दिली. परंतु खदान पोलिसांनी दोन घरफोड्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्याऐवजी एकच गुन्हा दाखल केला. दोन गुन्हे दाखल केले असते तर गुन्हय़ांची संख्या वाढली असती. संख्या वाढल्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात दिसत नाही. त्यामुळे सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हय़ांमध्ये बर्याचदा एकच गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो. खदान पोलिसांनीही केविलवाणा प्रयत्न शुक्रवारी केला.