हाती आलेले चोर डोळ्यादेखत निसटले
By Admin | Updated: July 8, 2016 20:23 IST2016-07-08T20:23:52+5:302016-07-08T20:23:52+5:30
शिवाजीनगर परिसर...मंगळवार...घरमालक घरी परत येतात...तुटलेल्या कुलुपाकडे लक्ष नसते...थेट घरात जातात तर आत तीन तरुण...मुलाचे मित्र समजून चौकशी करतात..

हाती आलेले चोर डोळ्यादेखत निसटले
ऑनलाइन लोकमत
पुणे : शिवाजीनगर परिसर...मंगळवार...घरमालक घरी परत येतात...तुटलेल्या कुलुपाकडे लक्ष नसते...थेट घरात जातात तर आत तीन तरुण...मुलाचे मित्र समजून चौकशी करतात...क्षणार्धात त्यांना धक्का मारुन तिघे पसार होतात...घराच्या आतील खोलीत जाऊन पाहतात तर चोरी झालेली...
शिवाजीनगरच्या रोकडोबा मंदिराजवळ गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी नंदकि शोर शास्त्री (वय ५६, रा. २६६, रजनीमहा अपार्टमेंट, रोकडोबा मंदीराजवळ, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. शास्त्री यांचा शालेय साहित्याचा व्यवसाय आहे. कामानिमित्त ते गुरुवारी सकाळी सीएकडे गेले होते. काम संपल्यावर साधारणपणे पाऊणच्या सुमारास घरी परतलेल्या शास्त्री यांना घराचे दार उघडे दिसले. मुलगा कॉलेजमधून घरी आल्यामुळे कदाचित घराचे दार उघडे असेल असे त्यांना वाटले. तुटलेल्या कडी कोयंड्याकडे त्यांचे लक्षच गेले नाही. ते घरामध्ये येत असतानाच बेडरुमधील कपाटातून ऐवज बॅगेत भरुन दोन चोरटे हॉलमध्ये आलेले होते. एकाच्या डोक्यावर हेल्मेट होते.
ते मुलाचे मित्र असावेत असा त्यांचा समज झाला. त्यांच्याकडे आस्थेवाईकपणे चौकशी करायला त्यांनी सुरुवात केली. गडबडलेले चोर त्यांना उत्तर न देताच शास्त्री यांना धक्का मारुन पसार झाले. शास्त्री यांनी आतील खोलीमध्ये जाऊन पाहिल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हाती आलेले चोरटे त्यांच्या हातून निसटले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले. पुढील तपास उपनिरीक्षक एच. एस. बोचरे करीत आहेत.