ठोक महागाई घसरली

By Admin | Updated: May 16, 2014 04:50 IST2014-05-16T04:50:11+5:302014-05-16T04:50:11+5:30

पालेभाज्या, अन्नधान्य वस्तू आणि इंधनाचे भाव घसरल्याने एप्रिल महिन्यात ठोक महागाई कमी होऊन ५.२ टक्क्यांवर आली.

Thick inflation fell | ठोक महागाई घसरली

ठोक महागाई घसरली

नवी दिल्ली : पालेभाज्या, अन्नधान्य वस्तू आणि इंधनाचे भाव घसरल्याने एप्रिल महिन्यात ठोक महागाई कमी होऊन ५.२ टक्क्यांवर आली. रिझर्व्ह बँक पुढील महिन्यात चलन धोरण आढावा जाहीर करणार असून यापूर्वी ठोक महागाईच्या निर्देशांकात घट नोंदली गेली आहे. शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार खाद्य वस्तूंच्या गटातील महागाई एप्रिलमध्ये ८.६४ टक्के राहिली. मार्चमध्ये ही ९.९ टक्के होती. कांद्याचे भाव एप्रिलमध्ये ९.७६ टक्क्यांनी कमी झाले. यापूर्वीच्या महिन्यात यात १.९२ टक्क्याची तेजी नोंदली गेली होती. अंडे, मासे तथा मांस यांचा महागाई दर ९.७ टक्क्यांवर आला. मार्चमध्ये हा ११.९ टक्क्यांवर होता. तथापि, या काळात बटाट्याचे भाव तेजीत होते. मात्र, एकूणच भाजीपाला बाजारात एप्रिलमध्ये महागाई कमी होऊन १.३४ टक्के राहिली. मार्चमध्ये हा आकडा ८,५७ टक्के होता. एप्रिलमध्ये मार्चच्या तुलनेत फळांच्या किमतीत किरकोळ तेजी नोंदली गेली. ठोक महागाई निर्देशांकानुसार इंधन, साखर व खाद्य तेल यापासून तयार वस्तूंच्या किमतीही घसरल्या. गेल्या काही दिवसांत जारी आकडेवारीनुसार ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाई एप्रिलमध्ये वाढून तीन महिन्यांची उच्च पातळी ८.५९ टक्क्यांवर आली. लक्ष रिझर्व्ह बँकेकडे रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरणाच्या चर्चेवेळी अन्य आर्थिक संकेतांसह महागाईच्या आकड्यांचाही विचार केला जातो. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रमुख धोरणात्मक व्याजदरांत कपात करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक येत्या ३ जून रोजी चलन धोरणाचा आढावा घेणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष आहे. रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई अधिक राहिल्याने एप्रिलमध्ये प्रमुख व्याजदर म्हणून ओळखला जाणारा रेपो रेट ८ टक्क्यांवर कायम ठेवला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ठोक महागाई निर्देशांक ४.७७ टक्क्यांवर होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Thick inflation fell