...तर त्यांना लाथाडले असते!
By Admin | Updated: September 29, 2014 07:35 IST2014-09-29T07:35:42+5:302014-09-29T07:35:42+5:30
भाजपा हा वाळवीसारखा पक्ष आहे. कोपऱ्याने खणत जातो. मी उद्धवच्या जागी असतो तर एक महिन्यापूर्वीच भाजपाला लाथ मारून गेलो असतो

...तर त्यांना लाथाडले असते!
मुंबई : भाजपा हा वाळवीसारखा पक्ष आहे. कोपऱ्याने खणत जातो. मी उद्धवच्या जागी असतो तर एक महिन्यापूर्वीच भाजपाला लाथ मारून गेलो असतो. परंतु राज्यातील युती दुभंगलेली असताना केंद्रात व महापालिकेत एकत्र राहण्याचे हे शिवसेनेचे ढोंग कशाला, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केला.
भाजपाबरोबर शिवसेनेलाही राज यांनी टीकेचे लक्ष्य केल्याने उद्धव-राज यांच्या एकत्र येण्याची शक्यता दुरावली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनसेच्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ कांदिवली येथील जाहीर सभेने झाला. राज म्हणाले, युती टिकणार नाही असे अनेक जण सांगत होते तर ते उद्धवला कसे कळले नाही? शेवटपर्यंत हे लाचारी का करीत राहिले? मी असतो तर एक महिन्यापूर्वीच लाथ मारून गेलो असतो. चिंतामणराव देशमुख यांचे दाखले हे देतात. मात्र तोच बाणेदारपणा शिवसेनेने दाखवला नाही. भाजपाने एवढा अपमान केल्यावर केंद्रातील मंत्रीपद ठेवता, महापालिकेतील युती ठेवता हे पाहिल्यावर तुम्ही दुभंगलेले आहात यावर विश्वास कसा ठेवायचा? महापालिकेतील युती तोडली तर यांचा इन्कम सोर्स बंद होईल. त्यामुळे हे ढोंग कशाला माजवता, असा टोलाही राज यांनी हाणला. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधीच महापालिकेतील सत्तेला लाथ मारली असती. ठाणे महापौर पदाच्या निवडणुकीत एका नगरसेवकाने गद्दारी केली. त्यामुळे चार वर्षांची सत्ता बाकी असताना ती सोडली, याची आठवण त्यांनी करून दिली.
मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाचे अतुल भातखळकर हे राम नाईक यांनी उत्तर भारतीयांचे प्रस्थ वाढवल्याने तर अहमदनगरमधील सदाशिव लोखंडे हे मतदारसंघाचे आरक्षण बदलल्याने मनसेची उमेदवारी मागायला आले होते. त्यावेळी मी नितीन गडकरी यांना दूरध्वनी करून भाजपाची ही पार्सल घेऊन जायला सांगितले होते, असा गौप्यस्फोट करून राज म्हणाले की, माझी भाजपाबरोबर युती नसतानाही इतक्या वर्षांचे संबंध पाहून मी त्यावेळी तसा वागलो आणि आता तेच भाजपावाले माझा आमदार पळवतात. त्यांना लाज कशी वाटत नाही. (विशेष प्रतिनिधी)