पहिलवान होण्यासाठी त्यांनी केल्या सोनसाखळी चो-या

By Admin | Updated: December 22, 2016 21:20 IST2016-12-22T21:20:50+5:302016-12-22T21:20:50+5:30

दोन महिन्यांपासून शहराच्या विविध भागांमध्ये लूटमार करणा-या चौघांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे.

They made the goldsmiths to be the wrestlers | पहिलवान होण्यासाठी त्यांनी केल्या सोनसाखळी चो-या

पहिलवान होण्यासाठी त्यांनी केल्या सोनसाखळी चो-या

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 22 - कोल्हापूरला जाऊन पहिलवान होण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून शहराच्या विविध भागांमध्ये लूटमार करणा-या चौघांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण करण्यासाठी या तरुणांना पहिलवान व्हायचे होते. या चौघांकडून एकूण 5 लाख 24 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.
अमर बाजीराव कराडकर (23, रा. उत्तम हाईट्स, अचानक चौकाजवळ, उत्तमनगर), भगवान बाबू मरगळे (20, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा, कोथरुड), कुलदीप हरीओम वालिम्की (23, रा. टे्रनीटी रेसीडेन्सी, उत्तमनगर), निलेश अशोक देशमाने (23, रा. सुतारदरा, कोथरुड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींचे यापुर्वीचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. तसेच त्यांचे शिक्षणही फारसे झालेले नाही. कराडकर हा सोनार असून वाल्मिकी याचे वडील सिम्बायोसिसमध्ये शिपाई आहेत. तर एकाचे वडील मंडम ठेकेदार आहेत.
गेल्या काही दिवसात उपनगर तसेच महामार्गांवर वाटमारीच्या घटना वाढल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे यांना खब-यामार्फत आरोपींची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून दोघांना पुण्यामधून तसेच अन्य दोघांना कोल्हापुरातून अटक करण्यात आली. आरोपींनी कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, हिंजवडीच्या हद्दीत तीन, चतु:श्रुंगीच्या हद्दीत एक असे सोनसाखळी चोरी तसेच हत्याराचा धाक दाखवत जबरी चो-या केल्याचे उघडकीस आले आहे. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून या चौघांनी चो-या करायला सुरुवात केली होती. त्यांच्याकडून 120 ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन दुचाकी, 10 मोबाईल, दोन कोयते, दोन चाकू आणि 4 हजारांची रोकड जप्त केली आहे.

भगवान मरगळे याला चो-या करुन कोल्हापुरला जायची कल्पना सुचली होती. वृत्तपत्रांतील गुन्हेगारीच्या बातम्या तसेच टीव्ही वरील मालिका पाहून त्यांना सुचलेली कल्पना प्रत्यक्षात आमलात आणली. महिलांना निर्जन स्थळी एकटे गाठून त्यांचा ऐवज हिसकावण्याची आरोपींची पद्धत आहे. गेल्याच महिन्यात एका महिलेला कोयत्याचा धाक दाखवत आरोपींनी लुटले होते. या घटनांची पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गांभिर्याने दखल घेतली होती. त्यानुसार, पोलिसांनी तपास करुन आरोपींना अटक केली.

झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेमधील राणा या नायकाच्या व्यक्तीमत्वावरुन प्रभावीत होऊन या चौघांनी पहिलवान होण्याचे ठरवले. गुन्हेगारीमध्ये दबदबा निर्माण करण्यासाठी पहिलवान व्हावे असे त्यांना वाटत होते. आरोपींनी कोल्हापुरला जाऊन तालीम लावण्याचा प्रयत्न केला होता. कोल्हापुरात एक खोली भाड्याने घेऊन आरोपी तेथे रहात होते. मागील 20 दिवसांपासून ते कोल्हापुरात एका तालमीत व्यायाम करीत होते. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त तुकाराम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील, निरीक्षक (गुन्हे) एस. एस. खटके, उपनिरीक्षक प्रेम वाघमारे यांच्या पथकाने केली.

Web Title: They made the goldsmiths to be the wrestlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.