ते जगताहेत वंचिताचं जगणं..!
By Admin | Updated: June 7, 2015 02:47 IST2015-06-07T02:47:27+5:302015-06-07T02:47:27+5:30
विठ्ठला तुझे धन अपार करील नामाचा व्यापार , तुझे धन सरता सरेना किती घेता मन हे भरेना ,

ते जगताहेत वंचिताचं जगणं..!
रमेश भोसले, औरंगाबाद -
विठ्ठला तुझे धन अपार करील नामाचा व्यापार ,
तुझे धन सरता सरेना किती घेता मन हे भरेना ,
पंढरपूरचा तु सावकार ..करील नामाचा व्यापार ..,
गल्लो गल्ली चाळीबोळी घ्या हो घ्या हो देतो आरोळी ..
गाढला संतांचा बाजार ..करील नामाचा व्यापार ..
खंजिरीवर नाजुक बोटांची खणखणीत थाप देऊन विठ्ठलनामाचा महिमा शाहिरी अंदाजात पेश करताना असंख्य रसिकांना खिळवून ठेवलं आहे ते लोककलावंत मीरा उमप यांनी. वडील वामन उमप यांच्याकडून मिळालेला वारसा पुढे चालू ठेवत अवघ्या महाराष्ट्रभर पारंपरिक लोककलेचं लेणं आपल्या भारूड, भजन, गवळण, गाणी यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पाच दशकांपासून त्या करीत आहेत. निरक्षर असलेल्या मीराताई यांनी सतत साक्षरतेचा वसा गावागावांत पोहोचविला आहे.
दिल्ली, मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या बहारदार खंजिरी वादनाचे कौतुक केले असून, अनेक नाट्य आणि साहित्य संमेलनेही त्यांनी गाजवली आहेत. मात्र ‘गेल्या सहा महिन्यांपासून कुठलाच कार्यक्रम झालेला नाहीये. राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, व्यसनमुक्ती पुरस्कार, संत गाडगेबाबा पुरस्कार असे एक ना अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत़ पण मग पुरस्कारांनी पोट भरतं का,’ असा प्रतिप्रश्न त्या विचारतात. राज्य शासनाच्या वतीने अनेक कलाकारांना मानधन दिले जाते़ पण, जे खरे कलाकार पोटाला चिमटा काढून आपली कला जोपसतात त्यांना यापासून वंचित ठेवले जात असल्याची खंत मीरातार्इंनी बोलून दाखविली. लोककलेला लोकाश्रय मिळण्याची गरज असून, कलाकारांची कदर होत नसल्याचे त्या सांगतात.
वास्तूशांती, बारसे यासारखे छोटे-मोठे कार्यक्रम करून आपल्या सोबत असलेल्या बारा- तेरा सहकलाकारांचं पथक सांभळतांना ओढाताण होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम नसल्याने कुठेही देवळात, शाळेत कार्यक्रम सादर करून लोकांनी केलेली मदत घेऊनच आला दिवस मागे लोटण्याची वेळ आली आहे. विटभट्टीवर काम करून ऊसतोडणी करताना उसाच्या फडातच तालीम केली असल्याचे त्या सांगायला विसरल्या नाहीत. कार्यक्रम नसले तर कानाकोपऱ्यात धिमडी वाजवित बसले तर तेवढेच लोक पाहतील आणि घरी जातील. लोककलेला लोकाश्रय मिळण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
उद्याच्या भाकरीची चिंता...
ज्या ठिकाणी रंगमंचावर कार्यक्रम सादर करत असताना समोरील रसिकांना पाहून आपण अपार धनसंपत्तीचे मालक असल्याचे वाटते.. पण जशी पावलं घराची वाट चालायला लागतात ना
तसं उद्याच्या भाकरीची चिंता वाढायला लागते... अन् तार्इंचा कंठ दाटतो!