‘ते’ स्मशानभूमीत साजरा करतात जन्मदिवस !
By Admin | Updated: January 25, 2015 01:00 IST2015-01-25T01:00:50+5:302015-01-25T01:00:50+5:30
जन्मदिवस हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविस्मरणीय दिवस. त्यामुळेच प्रत्येक जण आपला वाढदिवस छोट्यामोठ्या स्वरूपात का होईना, पण साजरा करतोच.

‘ते’ स्मशानभूमीत साजरा करतात जन्मदिवस !
रोहितप्रसाद तिवारी -
मोर्शी (अमरावती)
जन्मदिवस हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविस्मरणीय दिवस. त्यामुळेच प्रत्येक जण आपला वाढदिवस छोट्यामोठ्या स्वरूपात का होईना, पण साजरा करतोच. मात्र हा दिवस जगावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा काहींचा प्रयत्न असतो. मोर्शी तालुक्याच्या हिवरखेड गावातील नारायणराव मेंढे ही अशीच जगावेगळी व्यक्ती. गेल्या अनेक वर्षांपासून ते स्वत:चा जन्मदिवस स्मशानभूमीत साजरा करतात. त्यात शाळकरी मुले-मुलीही सामील होतात. स्मशानभूमीला शांतीवनात परावर्तित करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूआहेत.
नारायणराव यांच्यावर सुरुवातीला तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता. तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव सेवा मंडळाचे ते कार्यकर्ते देखील होते. पुढे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) विचारांनी प्रभावित होऊन ते या चळवळीत सामील झाले. अंनिस आणि तुकडोजी महाराजांचे विचार समाजात रुजवीत असताना त्यांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाकडे लक्ष केंद्रित केले. हिवरखेड गावातील रस्त्याच्या दुतर्फा त्यांनी विविध प्रजातींची रोपटी लावून त्यांचे संगोपन केले.
आज त्या रोपट्यांचे वृक्षांत रूपांतर झाले. हिवरखेड येथील स्मशानभूमीची जागा ओकीबोकी पडलेली होती. मेंढे यांनी या स्मशानभूमीचा कायापालट करण्याचे ठरविले.
समाजातील दानशूरांची त्यांनी याकामी मदत घेतली. स्मशानभूमीच्या आवारात वृक्षलागवड केली. त्यामुळे स्मशानभूमीचे चित्रच पालटले आहे. याच स्मशानभूमीत ते आपला जन्मदिवस साजरा करतात.
स्मशानात भूतप्रेतांचा वावर असल्याची शाळकरी विद्यार्थ्यांना वाटणारी भीती त्यांच्या मनातून घालविण्याच्या उद्देशाने स्वत:चा जन्मदिन मी स्मशानभूमीत साजरा करतो. मित्रमंडळींसोबत विद्यार्थ्यांनाही आवर्जून आमंत्रित करतो.- नारायणराव मेंढे