म्हणून शिवसेनेचा पोपट बोलतोय - मुख्यमंत्री
By Admin | Updated: February 15, 2017 22:32 IST2017-02-15T22:32:14+5:302017-02-15T22:32:14+5:30
उद्धव यांचा एक पोपट माझ्यावर आरोप करत आहे की, मी महापौर असताना नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार केला. पण त्या पोपटाने न्यायालयाचा अहवाल वाचला असता तर त्याने असा आरोप केला नसता

म्हणून शिवसेनेचा पोपट बोलतोय - मुख्यमंत्री
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - उद्धव यांचा एक पोपट माझ्यावर आरोप करत आहे की, मी महापौर असताना नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार केला. पण त्या पोपटाने न्यायालयाचा अहवाल वाचला असता तर त्याने असा आरोप केला नसता, असे आमदार अनिल परब यांचे नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फटणीस यांनी टीका केली. आज दुपारी शिवसेना आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यावर नागपूर महानगरपालिकेत महापौर पदावर असताना भ्रष्ट्राचार केल्याचे आरोप केले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. शिवसेनेकडून सौदेबाजी होते, असा गंभीर आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. पोपटाने किंवा साहेबांनी आपली संपत्ती जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईत तीन सभा झाल्या या सभेत त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली. पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त महापालिका झाली पाहिजे, ही तर जनतेची इच्छा तसेच आजच्या सभेतील गर्दी सांगते. मुंबईतील साकीनाका, घाटकोपर तसेच चिंचपोकळी येथे जाहिर सभा झाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे -
- काँग्रेस सरकारने त्याकाळी आम्हाला एका समितीच्या नावाखाली बदनाम करण्याचा कट रचला गेला
-आम्ही उच्च न्यायालयात गेलो. उच्च न्यायालयात आमची बाजू उचलून धरण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आमचे म्हणणे मान्य केले
- सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून यांनी महापालिका चालवली. आम्हाला सामान्यांचा विकास करायचा आहे
- नोटबंदीचा आणि महापालिकेचा काय संबंध? विकासकामाबाबत का बोलत नाही? लोकांना पाणी मिळत नाही, त्यावर का बोलत नाही
- नरेंद्र मोदीजी यांच्याविरोधात बोललेले जनतेला आवडत नाही, हे त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवा
- आम्ही 'करून दाखविले' असे सांगणारे नाही, तर करून दाखविणारे
- काही लोकांना झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन नको आहे. आम्ही आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यास तयार आहोत
- खंबाटाबाबत मराठी कामगाराची फसवणूक कुणी केली? २२ शाखाप्रमुखांना आणि कुणाच्या घरच्यांना खंबाटांकडून वेतन मिळते?
- भ्रष्टाचाराबाबत मी जेव्हा जेव्हा बोलतो, तेव्हा तेव्हा त्यावर गप्प का राहता? ७ वर्षाचे ऑडिट केव्हा देणार
- जो काच के घर में रहते, वों दुसरे कें घर पे पत्थर नहीं फेका करते