बारामती : नगरपालिकेच्या वाढीव हद्दीसह अन्य भागात नगरपालिकेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. हद्दीत येऊनदेखील गेली चार वर्षे बारामती ग्रामीण उपनगरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नव्हता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आंदोलनदेखील केले होते. या एकत्रित पाठपुराव्याची दखल घेऊन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली.वाढीव हद्दीतील कसबा भागातील वस्ताद लहुजीनगर भाग, सातव चौक, रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या नागरी वस्त्यांना याचा फायदा होईल. नगराध्यक्ष योगेश जगताप यांच्या हस्ते कामाला सुरुवात करण्यात आली. या भागाचे नगरसेवक विक्रांत तांबे यांनी नागरिकांच्या मागणीचा विशेष पाठपुरावा केला. त्यामुळे या भागातील पाणीप्रश्न सुटणार आहे. पाणीपुरवठा सभापती शैलेश बगाडे, नगरसेविका प्रतिभा खरात, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अमर धुमाळ, संदेश चिंचकर, नरेंद्र मिसाळ, सूरज सातव, विजय खरात, सुजय रणदिवे आदी या वेळी उपस्थित होते. सूर्यनगरी भागातील पथदिव्यांचे काम पूर्ण झाले आहे. या भागात सातत्याने चोऱ्या होत. त्यामुळे पथदिवे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी होती. वाढीव हद्दीत सर्वत्र एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. त्याची सूर्यनगरी, जळोची भागात काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पथदिवे सुरू करण्यात आले. (वार्ताहर)
वाढीव हद्दीतील पाणीप्रश्न सुटणार
By admin | Updated: July 31, 2016 01:13 IST