स्वतंत्र विदर्भ होणारच
By Admin | Updated: May 30, 2015 01:19 IST2015-05-30T01:19:20+5:302015-05-30T01:19:20+5:30
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत आहे. लहान राज्यांच्या निर्मितीबाबत भाजपाची सकारात्मक भूमिका कायम आहे
स्वतंत्र विदर्भ होणारच
नागपूर : भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत आहे. लहान राज्यांच्या निर्मितीबाबत भाजपाची सकारात्मक भूमिका कायम आहे व स्वतंत्र विदर्भ होणारच यात काहीच शंका नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. विदर्भाबाबत शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपाच्या नेत्यांवर सर्वपक्षीय टीका करण्यात येत आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी मुख्यमंत्र्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘लोकमत’ला ही प्रतिक्रिया दिली.
देशाच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे व लहान राज्यांतून योग्य विकास साधता येणे शक्य आहे. त्यामुळे पक्षाने आपली भूमिका सोडलेली नाही. मी स्वत: स्वतंत्र विदर्भाच्या समर्थनार्थच आहे. स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलनदेखील उभे केले होते व विरोधी पक्षात असताना वेळोवेळी हा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे विदर्भवाद्यांच्या भावनेला तडा जाईल, अशी कृती होणे शक्यच नाही. कोल्हापूर येथे झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीतदेखील माझी भूमिका कायम होती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)