ठाण्यात मेट्रोची १३ स्थानके होणार
By Admin | Updated: November 21, 2014 02:29 IST2014-11-21T02:29:24+5:302014-11-21T02:29:24+5:30
गेल्या कित्येक वर्षांपासून अडथळ्यांच्या शर्यतीत असलेल्या वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोला अखेर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या बैठकीत मंजुरी दिली.

ठाण्यात मेट्रोची १३ स्थानके होणार
ठाणे : गेल्या कित्येक वर्षांपासून अडथळ्यांच्या शर्यतीत असलेल्या वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोला अखेर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या बैठकीत मंजुरी दिली.
या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने आता ठाणेकरांनादेखील मेट्रोचा लाभ मिळणार आहे. मेट्रोच्या या मार्गासाठी १९ हजार कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून ३२ किमीच्या या मार्गामध्ये ३० स्थानके असून यात ठाण्यातील १३ स्थानकांचा समावेश आहे़ यातील २४ स्थानके भुयारी तर सहा स्थानके वरील बाजूस असणार आहेत. ठाण्यातील सर्व स्थानके भुयारीच असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. येत्या सहा ते सात वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. जुलैमध्ये एमएमआरडीएने कासारवडवली येथील कारशेडच्या सर्व्हेचे काम पूर्ण करून या कामाला वेग दिला होता. परंतु, केवळ मंजुरी मिळत नसल्याने या कामाला ब्रेक लागला होता. अखेर, आता या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने या कामाला वेग येणार आहे.
ठाण्यातील तीनहात नाका ते ओवळा कारशेडपर्यंत १३ स्थानके प्रस्तावित आहेत. यामध्ये तीनहात नाका, आरटीओ, वागळे, कॅडबरी, गोल्डन डाइज, कापूरबावडी, मानपाडा, पातलीपाडा, टिकुजिनीवाडी, आनंदनगर, वाघबीळ, कासारवडवली आणि ओवळा (कारशेड) अशी संभावित स्थानके त्यांनी दर्शविली आहेत. (प्रतिनिधी)