नालेसफाईचे पितळ उघडे पडल्याने भार्इंदरमध्ये सर्वत्र पाणीच पाणी
By Admin | Updated: August 1, 2016 03:26 IST2016-08-01T03:26:06+5:302016-08-01T03:26:06+5:30
पालिकेने केलेल्या नालेसफाईचे पितळ शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने उघड केले आहे.

नालेसफाईचे पितळ उघडे पडल्याने भार्इंदरमध्ये सर्वत्र पाणीच पाणी
भार्इंदर : पालिकेने केलेल्या नालेसफाईचे पितळ शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने उघड केले आहे. महामार्ग परिसर पाण्यात गेला होता. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, पालिकेच्या आपत्कालीन कक्ष, अधिकाऱ्यांशी नागरिकांनी वारंवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होत नव्हता. यामुळे त्यांच्या संतापात भर पडली.
हायवे परिसरातील मुन्शी कम्पाउंड, काशीगावातील मीनाक्षीनगर, वेस्टर्न पार्क, वेस्टर्न हॉटेल, ग्रीन व्हिलेज आदी झंकार नाल्याजवळील परिसरात दोन ते तीन फूट पाणी होते. नागरिकांचा रविवार घरातील पाण्यातच काढण्यात गेला. अनेक इमारतींमध्येही पाणी शिरल्याने घरातील धान्याचे नुकसान झाले. यांच्यासाठी नगरसेविका दक्षता ठाकूर व समाजसेवक राजेंद्र ठाकूर यांनी जेवणाची सोय केली. प्रभाग समिती-६चे अधिकारी वासुदेव शिरवळकर यांनी काही ठिकाणी भेट दिली. परंतु, तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास तेही असमर्थ ठरले.
मीरारोडमध्ये पूरसदृश परिस्थिती
मुसळधार पावसामुळे मीरा रोड व काशिमीरा भागात पूरसृदश परिस्थिती निर्माण झाली होती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांवरून पाण्याचा लोंढा आल्याने अनेक भाग पाण्याखाली गेला. शिवाय, नैसर्गिक नाल्यांमध्ये झालेले अतिक्रमण व मातीच्या भरावाकडे पालिका व महसूल विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.
मीरा गावठाण, लक्ष्मीबाग, माशाचापाडा, काशीगाव येथे पाणीच पाणी होते. माशाचापाडा भागात तर पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने अग्निशमन दलाचे जवान तळ ठोकून होते. पेट्रोलपंप पाण्याखाली गेल्याने तो बंद होता.
सिल्व्हर सरिता-विनयनगर, मुन्शी कम्पाउंड, मीराधाम, कृष्णस्थळ प्लेझंट पार्क, विजय पार्क, जांगीड इस्टेट, हेतल पार्क परिसर पाण्याखाली होता. हाटकेश भागातही पाणी साचले होते. शांती विद्यानगरी, एव्हरग्रीन सिटी, हरिया पार्क, ग्रीन कोर्ट क्लब येथे भरपूर पाणी होते, तर जुन्या इमारतींमध्ये तर कमरेभर पाणी साचले होते. पाणी उपसण्यासाठी पालिकेने पंप लावले होते. मात्र, पाण्याच्या प्रवाहापुढे पंपाचा फारसा उपयोग झाला नाही.