कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, आॅक्टोबर हीट जाणवू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 03:45 IST2017-10-03T03:45:40+5:302017-10-03T03:45:51+5:30
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, सोमवारी उत्तरकाशी, आग्रा, शिवपूर कल्याण, गांधीनगर, द्वारका या परिसरातून तो माघारी फिरला. येत्या ४८ तासांत तो गुजरात, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशातून माघारी परतण्याची शक्यता आहे़

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, आॅक्टोबर हीट जाणवू लागली
पुणे : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, सोमवारी उत्तरकाशी, आग्रा, शिवपूर कल्याण, गांधीनगर, द्वारका या परिसरातून तो माघारी फिरला. येत्या ४८ तासांत तो गुजरात, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशातून माघारी परतण्याची शक्यता आहे़ दरम्यान, येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़
गेल्या २४ तासांत कोकणात, म्हसाळा ११०, वैभववाडी ९०, लांजा ७०, संगमेश्वर, देवरुख ६०, देवगड ५०, मंडणगड, श्रीवर्धन ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ मध्य महाराष्ट्रात गगनबावडा ४०, गारगोटी, भुदरगड ३०, आजरा, पन्हाळा २० मिमी पाऊस झाला़ मराठवाड्यातील उदगीर ३० आणि विदर्भातील आमगाव, देवरी ५०, भामरागड, झरीजामनी ४० मिमी पाऊस झाला़
मान्सूनची माघार सुरू झाली असतानाच वातावरणातील आर्द्रता मात्र कायम असल्याने उष्मा वाढला आहे़ त्यामुळे राज्यात अनेक शहरांमध्ये आॅक्टोबर हीट जाणवू लागली आहे़ विदर्भातील अनेक शहरांतील कमाल तापमान ३४ ते ३६अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे़ पुण्यात रविवारी कमाल तापमान ३४़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़