मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे
By Admin | Updated: March 29, 2016 01:20 IST2016-03-29T01:20:08+5:302016-03-29T01:20:08+5:30
मराठी भाषिकांच्या राज्यासाठी मोठा संघर्ष झाला. १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. महाराष्ट्र एकसंध राहावे, शिवाय बेळगाव, बीदर, भालकीचा भाग राज्यात सामील होण्यासाठी प्रयत्न व्हायला

मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे
- नजीर शेख, औरंगाबाद
मराठी भाषिकांच्या राज्यासाठी मोठा संघर्ष झाला. १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. महाराष्ट्र एकसंध राहावे, शिवाय बेळगाव, बीदर, भालकीचा भाग राज्यात सामील होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.
मराठवाड्यात काही कार्यकर्ते वगळता नेत्यांमध्ये व राजकीय वर्तुळात वेगळ््या राज्याची चर्चा नाही; परंतु मराठवाड्याला विकासात डावलल्याची भावना आहे. दुसरीकडे बेळगाव, निपाणी, बीदर, भालकीसह महाराष्ट्र राज्य असायला हवे, म्हणून ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यासह कार्यकर्ते ५६ वर्षे लढा देत आहेत. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.
फाजल अली कमिशनने वेगळ््या विदर्भाच्या मागणीची शिफारस केली आहे. मात्र, मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावे, अशी कोणतीही शिफारस नाही. मराठी भाषिकांचे एकच राज्य व्हावे या हेतूने नागपूर करार झाला. आता त्याची अंमलबजावणी किती झाली, हा अभ्यासाचा विषय आहे. स्वतंत्र विदर्भची भूमिका मांडणारे नासिकराव तिरपुडे, जांबूवंतराव धोटे, बनवारीलाल पुरोहित यांना ठसा उमटविता आला नाही. तर स्वतंत्र राज्याच्या विषयावर मराठवाड्यातील नेते बोलत नाहीत, असे एन. डी. पाटील यांनी सांगितले.
अखंड महाराष्ट्रातच आमचे हित आहे. महाराष्ट्राचे तुकडे पडणार असतील तर आम्हाला कुणाचा आधार राहणार, असे समितीचे बेळगावचे आ. संभाजी पाटील म्हणाले. कर्नाटकमध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून दुय्यम नागरिकाचे जिणे जगत आहोत. येथे प्रत्येक शाळा कानडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र एक राहिला तर महाराष्ट्रात सामील होण्याच्या मागणीला महत्त्व आहे, असे बीदरचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामराव राठोड यांनी सांगितले.
आमच्याप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्याचीही लोकभावना असू शकते. मात्र, सीमा भागातील नागरिकांचा लढा हा संस्कृती आणि भाषेचा आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्याचा विकासाच्या मुद्द्यावर आहे. दोन्ही विभागांचा विकास झाल्यास त्यांची मागणी पुढे जाणार नाही, असे मत समितीचे बेळगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केले.