ढगाळ वातावरणाची मुंबईत शक्यता
By Admin | Updated: January 26, 2015 04:10 IST2015-01-26T04:10:42+5:302015-01-26T04:10:42+5:30
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर आता ओसरल्याने मराठवाडा वगळता उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येऊ लागली आहे.

ढगाळ वातावरणाची मुंबईत शक्यता
मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर आता ओसरल्याने मराठवाडा वगळता उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येऊ लागली आहे. शिवाय हवामानातील बदलामुळे उत्तर-मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून, मुंबईत हवामान ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गेल्या आठवडाभरापासून राज्यातील हवामानात बदल नोंदविण्यात येऊ लागले आहेत. राज्यातील थंडीचा जोर काहीसा ओसरला असून, गेल्या सात दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र राज्यातील हवामान कोरडे नोंद झाले आहे. दुसरीकडे हवामान खात्यानुसार, मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. कोकण-गोवा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, कमाल तापमानात मात्र घट नोंदविण्यात येत आहे. किमान तापमान १५ अंशाहून २१ अंशावर पोहोचले असून, कमाल तापमान ३१ अंशाहून २८ अंशावर घसरले आहे. शिवाय दोन दिवसाआड शहरातील वातावरण ढगाळ होत आहे. परिणामी, शहरातील दिवसाच्या वातावरणातील गारवा कमी झाला असून, रात्री वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे गारवा टिकून आहे. (प्रतिनिधी)