अध्यक्षपदाच्या व्यूहरचनेतून आता माघार नाही
By Admin | Updated: October 10, 2016 03:10 IST2016-10-10T03:10:18+5:302016-10-10T03:10:18+5:30
डोंबिवली : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची विशिष्ट तऱ्हेची व्यूहरचना असते. प्रत्येक उमेदवार हा संधीच्या शोधात असतो. त्यामुळे आता मी दाखल केलेला

अध्यक्षपदाच्या व्यूहरचनेतून आता माघार नाही
डोंबिवली : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची विशिष्ट तऱ्हेची व्यूहरचना असते. प्रत्येक उमेदवार हा संधीच्या शोधात असतो. त्यामुळे आता मी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेऊन मागे हटण्याचा प्रश्नच उद््भवत नाही, अशी भूमिका अध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवार प्रवीण दवणे यांनी व्यक्त केली.
मी अर्ज भरण्यामागे कोणतेही राजकारण नाही, तर साहित्य रसिकांचे मला मिळालेले प्रेमकारण आहे. त्यामुळे पद मिळाले नाही, तरी मी दु:खी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डोंबिवलीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीला दवणे उपस्थित होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताच ती बातमी केवळ माध्यमांतच नव्हे, तर सोशल मीडियावरूनही झळकली. मी उभा राहिल्याने आनंद व्यक्त करून मला पाठिंबा मिळाला. निवडणुकीच्या खर्चासाठी मदतीचे आश्वासन दिले, असे त्यांनी सांगितले.
संमेलनात युवक आणि ग्रामीण भागांतील साहित्यिकांना व्यासपीठ मिळायला हवे. साहित्याचा कोणताही विषय सध्याच्या फास्ट जीवनशैलीत ‘ब्रेकिंग न्यूज’ न होता तो ‘लिंकिंग न्यूज’ व्हायला हवा. मला अध्यक्षपद मिळाले, तर सृजनात्मक साहित्यिक काम करण्यावर मी भर देणार आहे. विविध महाविद्यालयांत मराठी भाषेची वाड्.मयमंडळे आहेत. त्यांच्यापर्यंत साहित्य पोहोचवण्याचे काम करणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी भेट देऊन त्याचा कार्यअहवाल साहित्य महामंडळाकडे सादर करेन, असा संकल्पच त्यांनी जाहीर केला.
सध्या मातृभाषेचे विद्रूपीकरण होत आहे. मराठी भाषेवर इतर भाषांचे अतिक्रमण वाढले आहे. मराठी भाषिक विद्यार्थी इंग्रजीतून शिक्षण घेतो. तेव्हा तो गणेशाला ‘एलिफंट गॉड’ असे म्हणत असेल, तर तो मराठी असूनही त्यांच्या भाषेचे काय होणार? हे विद्रूपीकरण थांबवण्याचे काम करण्यावर भर देऊ. साहित्याच्या संवेदनशीलतेचा उत्कट पदर हरवता कामा नये. साठच्या दशकातील आमची पिढी साहित्यावर तरली आहे. आमच्या जगण्याचा पाया साहित्य होता. आजचा तरुण निराश आहे. आत्महत्या करीत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
लेखक आपल्या भेटीला
च्संमेलनात ‘लेखक आपल्या भेटीला’ असा एखादा कार्यक्रम करण्याची सूचना दवणे यांनी केली. या भेटीचा फायदा तरुण पिढीला आणि नवोदितांना होईल.
च्लेखक कसा घडला, यापासून कसे लिहावे, नकार कसा पचवावा, उद्दिष्ट कसे गाठावे, हे सर्व त्यांना समजेल. त्यांची उमेद वाढेल, असा दाखला त्यांनी दिला.