सात तारखा देऊनही निकाल नाहीच!
By Admin | Updated: September 25, 2014 04:55 IST2014-09-25T04:55:16+5:302014-09-25T04:55:16+5:30
जावेद, सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि अत्याचार केला, असे जाधव यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सुनावणी संपली असून निकालासाठी सात वेळा तारखा देऊनही अद्याप निकाल देण्यात अलेला नाही.

सात तारखा देऊनही निकाल नाहीच!
जितेंद्र कालेकर, ठाणे
गृहरक्षक दलाचे विशेष पोलीस महासंचालक अहमद जावेद आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांच्यासह सहा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल देण्यात विलंब होत असल्याबद्दल विशेष न्यायाधीश एम. ए. लोवेकर यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवृत्त पोलीस अधिकारी बबन जाधव यांनी केली आहे. जावेद, सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि अत्याचार केला, असे जाधव यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सुनावणी संपली असून निकालासाठी सात वेळा तारखा देऊनही अद्याप निकाल देण्यात अलेला नाही.
निवृत्त पोलीस अधिकारी बबन जाधव यांनी जावेद आणि सिंग यांच्यासह विशेष पोलीस महासंचालक एस.पी. गुप्ता, निवृत्त पोलीस उपायुक्त विश्वास साळवे, गृह विभागाचे तत्कालीन कक्ष अधिकारी पी. एम. वानखेडे आणि एसीपी विलास शिंदे या अधिकाऱ्यांविरुद्ध सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याची सुनावणी २ जुलै २०१४ रोजीच संपली. निकालासाठी १६ जुलै ही तारीख देऊनही निकाल दिला नाही. त्यानंतर तब्बल सहा तारखा देऊनही निकाल मात्र दिलाच नाही. ज्येष्ठ नागरिक असूनही जाधव हे या सर्व तारखांना कधी ठाणे तर कधी सांगलीहून न्यायालयात येत होते. सुनावणी संपल्यानंतर क्रिमिनल प्रोसिजरनुसार १५ दिवसांत निकाल देणे अपेक्षित आहे. तरीही, कोणतेही कारण न देता निकालास विलंब झाल्यामुळे हा प्रकार संशयास्पद आल्याचे जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. निकाल देण्यास न्या. लोवेकर विलंब करत असल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या दक्षता विभागाचे निबंधक बी.पी. पाटील यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.