बाळासाहेबांसारखा दरारा असलेला नेताच नाही - उद्धव यांचा मोदींना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 22:46 IST2017-01-07T21:35:29+5:302017-01-07T22:46:28+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दरारा असलेला दुसरा नेता नाही असे उद्गार उद्धव यांनी स्मारक लोकार्पण कार्यक्रमादरम्यान काढले.

बाळासाहेबांसारखा दरारा असलेला नेताच नाही - उद्धव यांचा मोदींना टोला
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. ७ - ‘गर्व से कहो हम हिंदू है’, असे छातीठोकपणे म्हणणारा, बाबरी मशीद पाडल्यावर मुंबईतील दंगल शांत करणारा, असा दरारा आणि दम असलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याखेरीज दुसरा अन्य कुठलाही नेता देशात झालेला नाही, असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. कल्याण-डोंबिवली महापालिकेने काळा तलाव येथे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा २२ फुटांचा पुतळा उभारला आहे. शनिवारी संध्याकाळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. बाळासाहेबांच्या या स्मारकाच्या लोकार्पणामुळे गेले आठवडाभर कल्याणमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. कोल्हापूरहून सोमवारी बाळासाहेबांच्या 22 फुटी भव्य पूर्णाकृती शिल्पाचे वाजतगाजत, ढोल ताशांच्या गजरात कल्याण नगरीत आगमन झाले होते. तेव्हापासूनच कल्याण नगरी या स्मारकाच्या लोकार्पणसाठी सजू लागली होती.
बाळासाहेब हे देशव्यापी व्यक्तिमत्व
बाळासाहेब देशव्यापी व्यक्तिमत्व व्हावे यासाठी ठिकठिकाणी त्यांचे स्मारक होणे गरजेचे आहे. बाळासाहेबांनी कधीही स्वत: शस्त्र वापरले नाही. पण, त्यांच्या कुंचल्यांचे फटकारे हेच शस्त्र होते. त्याने भलेभले घायाळ होत होते. प्रख्यात चित्रकार डेव्हिड लो यांना बाळासाहेब गुरुस्थानी मानत होते. लो यांना हिटलर घाबरत होता, तर बाळासाहेबांना सर्व जण घाबरत होते. अशी दहशत म्हणा की दरारा, दम असलेले ते एकमेव व्यक्तिमत्व होते. १९९२-९३ मध्ये मुंबईत जातीय दंगली झाल्या, तेव्हा बाळासाहेबच त्या दंगली शांत करू शकले. मुंबईत बसून त्यांनी अमरनाथ यात्रा सुरू करून दाखवली. पाकिस्तानी अधिकारी मुंबईत आल्यावर बाळासाहेबांची भेट घेतल्याखेरीज त्यांची भारतभेट पूर्ण होत नव्हती. कल्याणने बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभे केले. कल्याणकरांच्या ऋणातून ठाकरे कुटुंबीय उतराई होऊ शकत नाही, असे नमूद करून ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांचे स्मारक उभे करण्याच्या स्पर्धेत कल्याण-डोंबिवलीकर हे मुंबईकरांच्या पुढे गेले आहेत. हे आव्हान स्वीकारून असेच भव्यदिव्य स्मारक मुंबईत करून दाखवू. आता महापौर देवळेकर यांनी कल्याणच्या आरमाराची प्रतिकृती उभी करण्याचे काम हाती घ्यावे, असे त्यांनी सुचवले.
आम्ही काळ्याचे भगवे करून दाखवले, भाजपाला टोला
देशात काळ्याचे पांढरे करणे सुरू असताना आम्ही काळ्याचे (काळातलाव) भगवे करून दाखवले, असा टोला उद्धव यांनी राज्यमंत्री चव्हाण यांच्याकडे पाहत लगावला. यावेळी उद्धव यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले. मागील वेळी कल्याणमध्ये स्वच्छता मोहिमेकरिता आलो, तेव्हा आचारसंहिता लागू होती, तर आज पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याकरिता आलो, तरीही निवडणूक आचारसंहिता लागू आहे. या कार्यक्रमाला निवडणूक आयोगाने अनुमती दिली, त्याबद्दल उद्धव यांनी आयोगाचे आभार मानले.