अडतमुक्त असलेल्या जळगावच्या बाजार समितीत व्यापा-यांच्या बंदचा परिणाम नाही
By Admin | Updated: July 13, 2016 19:33 IST2016-07-13T19:33:28+5:302016-07-13T19:33:28+5:30
शेतक-यांच्या शेतमाल विक्रीवरील अडत ही व्यापा-यांकडून घेण्यात यावी, असा अध्यादेश शासनाने काढला आहे. या अध्यादेशाविरोधात राज्यभर अडते-व्यापा-यांचे आंदोलन सुरु असले

अडतमुक्त असलेल्या जळगावच्या बाजार समितीत व्यापा-यांच्या बंदचा परिणाम नाही
>खामगाव : शेतक-यांच्या शेतमाल विक्रीवरील अडत ही व्यापा-यांकडून घेण्यात यावी, असा अध्यादेश शासनाने काढला आहे. या अध्यादेशाविरोधात राज्यभर अडते-व्यापा-यांचे आंदोलन सुरु असले तरी जळगाव जामोद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आंदोलनाचा काहीही परिणाम नाही. या बाजार समितीत शेतकºयांच्या शेतमालावर अडतच घेतली जात नसल्याने येथील शेतमाल खरेदी विक्रीची रेलचेल नेहमीप्रमाणे सुरु आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापनेपासून जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकमेव अडतमुक्त बाजार समिती आहे. याठिकाणी बाजारात माल आणणा-या शेतक-यांना एक रूपयाही अडत द्यावी लागत नाही. त्यामुळे दरवर्षी या तालुक्यातील शेतकºयांची कोट्यावधीची अडत वाचते.
शासनाने शेतक-यांची अडतीच्या जोखडातून मुक्तता करीत त्यांचा शेतमाल थेट विक्रीची मुभा दिली. फळे व भाजीपाला बाजार समितीत आणि समितीबाहेर विकण्याची मुभा दिली. त्यामुळे सध्या अडत्यांनी बंद पुकारला आहे. जळगाव जामोद कृउबास मध्ये महत्वपूर्ण असा आसलगाव धान्य बाजार आहे. त्यानंतर जामोद आणि पिंपळगाव काळे हे दोन उपबाजार आहेत. यापैकी जामोद येथेही धान्य खरेदी मोठ्या प्रमाणावर चालते. शेतक-यांचे हित लक्षात घेता. या बाजार समितीत स्थापनेपासून अंदाजे ४० वर्षापासून शेतक-यांना अडत द्यावी लागत नाही. राज्य शासन शेतक-यांना अडतमुक्त करीत ती अडत व्यापा-यांकडे लोटण्याचा प्रयत्न करीत आहे. अडत मुक्तीची परंपरा जोपासत ही बाजार समिती शेतकरी हितास ख-या अर्थाने हातभार लावणारी ठरली आहे.