खडसेंच्या भुईमुगाशी देणंघेणं नाही - उद्धव
By Admin | Updated: November 26, 2014 01:53 IST2014-11-26T01:53:38+5:302014-11-26T01:53:38+5:30
खडसेंचे भुईमूग वर येतात की, खाली ते मला माहित नाही. त्यांच्या भुईमुगाशी मला काही देणंघेणं नाही. मला शेतक:यांचे प्रश्न महत्वाचे आहेत,
खडसेंच्या भुईमुगाशी देणंघेणं नाही - उद्धव
औरंगाबाद : खडसेंचे भुईमूग वर येतात की, खाली ते मला माहित नाही. त्यांच्या भुईमुगाशी मला काही देणंघेणं नाही. मला शेतक:यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या टिकेला मंगळवारी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.
गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना आमदारांसमवेत उद्धव मराठवाडा दौ:यावर आहेत. वीजबिलासंदर्भात खडसे यांनी केलेल्या विधानावर त्यांनी काल टीका केली होती. त्या टिकेला प्रत्युत्तर देताना खडसेंनी आज उद्धव ठाकरे यांना भुईमुगातील काही कळते का, असा सवाल केला होता. त्यावर उद्धव म्हणाले,
खडसे काल अजित पवारांची भाषा बोलले आणि आज शरद पवारांची! पवारांनी एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना रताळे कुठे उगवतात हे माहिती आहे का, असा सवाल केला होता. त्यावर बाळासाहेबांनी त्यांना ठाकरेशैलीत उत्तर दिले होते. पण मी खडसेंना इथे तशा भाषेत उत्तर देऊ इच्छित नाही.
खडसे हे उपग्रहाच्या मदतीने दुष्काळाची माहिती घेत आहेत. उपग्रहाच्या आधारेच दुष्काळाची माहिती घ्यायची असेल, तर मंत्रिमंडळ कशाला हवे, असा सवालही ठाकरे यांनी केला. (प्रतिनिधी)
सध्यातरी स्वप्नरंजन नाही
शिवसेना सध्यातरी सत्तेत सहभागी होण्याच्या स्वप्नरंजनात नाही. उद्या काय होईल, ते आज सांगणो अवघड आहे. आजघडीला विरोधी बाकावर बसण्याची पक्षाची भूमिका असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. तर भाजपाचे सरकार अल्पमतात असल्याचे विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे म्हणाले.