कोंडी फोडण्याचा आराखडाच नाही

By Admin | Updated: March 1, 2017 03:53 IST2017-03-01T03:53:49+5:302017-03-01T03:53:49+5:30

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अन्यथा रस्त्यांच्या कामांना परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी डोंबिवलीतील नगरसेवकांनी केली

There is no design plan | कोंडी फोडण्याचा आराखडाच नाही

कोंडी फोडण्याचा आराखडाच नाही

अनिकेत घमंडी,
डोंबिवली- शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अन्यथा रस्त्यांच्या कामांना परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी डोंबिवलीतील नगरसेवकांनी केली होती. त्याची दखल घेत कोंडी फोडण्यासाठी तीन दिवसांत आराखडा सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी वाहतूक विभागाला दिले होते. मात्र, त्यास १५ दिवस उलटूनही आराखडाच तयार नसल्याची बाब माहिती समोर आली आहे.
शहरातील पूर्व व पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसर, केळकर रोड, मानपाडा, शेलार नाका, टिळक पथ, चार रस्ता, शिवमंदिर रोड, दत्तनगर आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. ती फोडण्यासाठी वाहतूक विभागामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच इंदिरा गांधी चौक, रामनगर परिसरातील स्वामी विवेकानंद रोडवर वाहतूक शाखेसमोरच रिक्षाचालकांची मनमानी पाहायला मिळते. वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच काही रिक्षाचालक रिक्षा बंदचा नारा देतात. त्यामुळे कारवाई स्थगित होते. दुसरीकडे भगत सिंग रोड, टिळक पथवर असलेल्या बहुतांशी मंगल कार्यालयांबाहेर उभ्या केल्या जाणाऱ्या चारचाकी गाड्यांमुळे कोंडीत भर पडते. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो. मंगल कार्यालय चालक-व्यवस्थापकांवर कारवाई होत नसल्याने कोंडी होते, असा आरोप वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच केला.
दुसरीकडे महापालिकेकडे देखिल कोणतेही नियोजन नाही. एकेरी वाहतूक, पार्किंगची सुविधा नाही. सम-विषम पार्किंगचे नियमही वाहनचालकांकडून खुलेआम धाब्यावर बसवले जातात. या प्रकारांमुळे डोंबिवलीत वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडत आहे. पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर नेहमीच कोंडी होते. शुक्रवार ते रविवार येथे वाहने अक्षरश: अडकून पडतात. त्यामुळे वाहनाने पूर्व-पश्चिमेला ये-जा करणे हा द्रविडीप्राणायमच आहे, असे मत पश्चिमेतील नगरसेवकांनी व्यक्त केले. त्यासाठी १५दिवसांपूर्वी महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायीचे सभापती रमेश म्हात्रे, आयुक्त रवींद्रन, वाहतूक नियंत्रण विभागाचे अधिकारी आदींनी आढावा बैठक घेतली होती. त्यात तीन दिवसांत आराखडा द्यावा, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आदेश रवींद्रन यांनी दिले होते. मात्र आराखडा कागदावरही तयार झाला नसल्याने आदेशाला हरताळ फासल्याची चर्चा वाहतूक कर्मचारी व लोकप्रतिनिधींमध्ये सुरू आहे.
>केडीएमसी आयुक्त रवींद्रन यांच्या सांगण्यानुसार तीन दिवसांत आराखडा द्यायचा होता, पण निवडणुकांची आचारसंहिता, बंदोबस्त तसेच काही अधिकारी रजेवर असल्याने ते काम अद्यापही झालेले नाही. दोन-तीन दिवसांत ते केले जाईल.
- अक्षय आव्हाड, सहायक पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग.
मला यासंदर्भात काहीही माहिती नाही. मी वैयक्तिक कारणांमुळे रजेवर होतो. पण यासंदर्भात माहिती घेतली जाईल.
- गोविंद गंभीरे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण विभाग, डोंबिवली.

Web Title: There is no design plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.