खाद्यान्नाबाबत तक्रारी नाहीच
By Admin | Updated: April 7, 2015 04:45 IST2015-04-07T04:45:51+5:302015-04-07T04:45:51+5:30
घर घेताना फसवणूक झाली, विम्याचे पैसे मिळाले नाहीत, घेतलेल्या वस्तूंमध्ये काही दोष आढळला तर ग्राहक तत्काळ याविषयीची तक्रार ग्राहक पंचायतीत

खाद्यान्नाबाबत तक्रारी नाहीच
पूजा दामले, मुंबई
घर घेताना फसवणूक झाली, विम्याचे पैसे मिळाले नाहीत, घेतलेल्या वस्तूंमध्ये काही दोष आढळला तर ग्राहक तत्काळ याविषयीची तक्रार ग्राहक पंचायतीत नोंदवण्यास जातो. मात्र खाद्यपदार्थ, पेय यामध्ये भेसळ असेल अथवा दोष असल्यास त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. पण, तरीही ग्राहक याबाबत उदासिनच असल्याचे चित्र दिसून येते. मुंबई ग्राहक पंचायतीत गेल्या एका वर्षात एकही खाद्यान्नाविषयीची तक्रार आलेली नाही, यावरून हेच स्पष्ट झाले आहे.
७ एप्रिल हा ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाच्या आरोग्य दिनाची संकल्पना ‘अन्न सुरक्षा’ अशी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, वर्षाला २.२ दशलक्ष व्यक्तींचा मृत्यू हा अतिसारामुळे होतो. ज्यात जवळपास १.९ दशलक्ष लहान मुलांचा समावेश असतो. अन्नातील भेसळ, अन्नपदार्थांतील दोषांमुळे अनेक आजार जडतात. खाद्यान्नाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केल्यावर त्याचा थेट परिणाम हा आरोग्यावर होतो. हे अनेक सुशिक्षितांना माहीत असले तरीही याविषयी अनास्थाच दिसून येते.
मुंबई ग्राहक पंचायतीकडे वर्षाला एक ते दीड हजार तक्रारी येतात. यापेक्षा दुप्पट जण ही फक्त एकदाच येतात आणि केवळ सल्ला घेऊन जातात. पण गेल्या वर्षभरात पंचायतीकडे एकही खाद्यपदार्थ, पेय संदर्भातील तक्रार दाखल न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेकदा नामांकित कंपनीच्या पॅकड् फूडमध्ये दोष असतात, चॉकलेट्समध्ये अळ्या आढळतात. हे अतिशय गंभीर विषय आहेत. असे असूनही ग्राहक याबाबत तक्रारी करण्यास उदासीनच असल्याचे दिसून येते, असे पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पंचायतीतर्फे केलेल्या सर्वेक्षणातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. ४६ टक्के नमुन्यांमध्ये किमान निकषांचे उल्लंघन करण्यात आले होते. २५ टक्के नमुन्यांमध्ये पाणी मिसळलेले होते. तर, ५ टक्के नमुन्यांत स्टार्च, युरिया, साखर या घटकांची भेसळ केल्याचे आढळले आहे. यासंबंधीचा संपूर्ण अहवाल अन्न व औषध प्रशासनाला शनिवार, ४ एप्रिल रोजी सादर करण्यात आला आहे. शुद्ध दूध हा सर्वांचा हक्क आहे. यासाठी सर्वांना हा हक्क मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांंची एकत्र बैठक घेणे अपेक्षित आहे, असे दूध मोहिमेच्या कार्यकारिणी सदस्य ज्योती मोडक यांनी सांगितले.