आबांवर ‘तो’ आरोप नको
By Admin | Updated: March 10, 2015 01:59 IST2015-03-10T01:59:47+5:302015-03-10T01:59:47+5:30
सर्वाधिक काळ जवळपास अकरा वर्षे राज्याचे गृहमंत्री पद सांभाळणा-या आर. आर. पाटील यांनी कधी तत्वांशी तडजोड केली नाही.
आबांवर ‘तो’ आरोप नको
मुंबई : सर्वाधिक काळ जवळपास अकरा वर्षे राज्याचे गृहमंत्री पद सांभाळणा-या आर. आर. पाटील यांनी कधी तत्वांशी तडजोड केली नाही. पारदर्शीपणे कारभार केला. पण, शेवटपर्यंत त्यांच्या मनाला एक बोचणी होती. ती म्हणजे २६/११च्या मुंबई हल्ल्यानंतर ‘बडे बडे शहरों मैं..’ हे वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आले. आबा तसे बोलले याचा कोणताच पुरावा नाही. त्यांनी स्वत: त्याचा इन्कार केला. पण माध्यमांसह सर्वांनीच त्यांच्यावर टीका केली. या आरोपाची बोच त्यांना कायम होती. किमान आता तरी त्या आरोपातून आबांची मुक्तता करा, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केले. आर. आर. पाटील यांच्यावरील शोकप्रस्तावावर ते बोलत होते.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत नेत्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, शिवसेनेचे प्रकाश (बाळा) सावंत, माजी मंत्री जगन्नाथराव जाधव, रमेश पान्या वळवी, भागूजी गाडेपाटील, सुखदेव उईके, रामकिशन दायमा, विश्वनाथराव जाधव आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. यावेळी फडणवीस म्हणाले की, आबांच्या निधनाने राज्याने संवेदनशील लोकप्रतिनिधी गमावला. सामान्य कुटुंबातून राजकारणात आलेल्या आबांनी कायम सर्वसमान्य जनतेचा विचार केला. संसदीय राजकारणातील सारी आयुधे जनहितासाठी वापरण्यासाठी त्यांची धडपड असे. म्हणूनच संसदेच्या धर्तीवर जेव्हा विधिमंडळात उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्काराची सुरुवात करण्यात आली, तेव्हा त्याचे पहिले मानकरी आबा ठरले. गृहमंत्रीपद सांभाळताना वशील्याशिवाय, पारदर्शक अशी पोलिस भरतीची प्रक्रीया आबांनी राबवली. तंटामुक्ती सारख्या त्यांच्या योजनांची दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर बोलताना अजित पवार म्हणाले की, निवडणुकीनंतर पहिल्या चार महिन्यात तीन विद्यमान आमदार आपल्यातून गेले. त्यात गेली २५ वर्षे अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजविणा-या आबांचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटंीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, छगन भुजबळ, पतंगराव कदम, जयंत पाटील, गणपतराव देशमुख, शरद सोनावणे, अर्जुन खोतकर, अबू आझमी आदी नेत्यांनी श्रध्दांजलीपर भाषणे केली. शोकप्रस्तावानंतर विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. (विशेष प्रतिनिधी)