काडीमोडीचीच चर्चा, पुढे काय करणार याचा अजेंडाच नाही
By Admin | Updated: October 5, 2014 02:32 IST2014-10-05T02:28:33+5:302014-10-05T02:32:43+5:30
अकोला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनात प्रकाश आंबेडकर यांची सर्वच पक्षांवर टीका.

काडीमोडीचीच चर्चा, पुढे काय करणार याचा अजेंडाच नाही
अकोला- विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यात काही पक्षांचा काडीमोड झाला. तो का झाला, हे आता त्यांना सांगावे लागत आहे. या काडीमोडीचीच चर्चा अधिक होत आहे. पुढील पाच वर्षे काय करणार, याचा अजेंडा कोणत्याच पक्षाकडे नसल्याची टीका करीत व्यवस्थेत बदल घडवून आणणारा सामाजिक व राजकीय अजेंडा मांडण्याचे सार्मथ्य केवळ आंबेडकरी चळवळीतच असल्याचे प्रतिपादन अँड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे केले.
भारतीय बौद्ध महासंघाच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानावर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र दारोकार गुरुजी होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून २८ वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेचे महत्त्व विशद केले. परिवर्तन ही काळाची गरज आहे. हे परिवर्तन संघटना आणि माणसांपुरते र्मयादित न राहता सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी होत असेल तर त्याचे स्वागत आहे, पण ते बेगडी असेल, तर त्याचा निषेध केला पाहिजे, असे अँड. आंबेडकर यावेळी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीच महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली नाही. त्यांचे विचार पटत नसल्याने विरोध होत होता. आता उठता बसता गांधींचे नाव घेतले जात आहे. हे बेगडी परिवर्तन आहे; विचारांच्या परिवर्तनाची गरज आहे. विचारात परिवर्तन येणार नाही, तोपर्यंत सर्वसामान्य माणसांना न्याय मिळणार नाही. ही व्यवस्था लुटारूंची झाली आहे. या व्यवस्थेत बदल करण्यासाठी अधिकाराच्या वापरावर नियंत्रण आले पाहिजे. शाळा शुल्क ठरविण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन नव्हे, तर पालक-शिक्षक संघाकडे असायला हवे. हे बदल हवे असेल तर तसे विचार करणारे लोकप्रतिनिधी विधानसभेत बसेल पाहिजे. भूमाफिया, कंत्राटदारांचे प्रतिनिधी पुन्हा निवडून आले, तर सर्वसामान्यांचा संघर्ष आता आहे, तसाच सुरू राहील. वेगवेगळ्य़ा धर्मातील लोकांचे अधिकार ठरवून दिले आहेत. या अधिकाराला सीमा नसली, तर कुणी कसाही वागतो. त्यामुळे अधिकाराच्या र्मयादा स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. ती ताकद आंबेडकरी चळवळीत आहे. नुसते विचार असून चालत नाही, तर त्यासाठी ताकद हवी आहे. ही ताकद देण्यासाठीच विचारांच्या मागे चालणारा माणूस विधानसभेत पाठविण्याचे आवाहन अँड. आंबेडकर यांनी केले.
** छोट्या राज्यात छोट्या समाजांना न्याय!
महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा राज्याची लोकसंख्या ३ कोटी होती. आता ती १२ कोटींवर गेली आहे. तेव्हा जसे राज्य चालत होते, तसेच राज्य आता लोकसंख्या वाढल्यावरही चालणे शक्य नाही. लोकसंख्या जशी वाढत जाईल, तशी राज्य लहान करत जावे, तरच ती कल्याणकारी, विकसित राज्य होतील, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. गोरगरीब-उपेक्षितांचं भलं छोट्या राज्यातच होऊ शकते. विधानसभेसाठी उमेदवारी देताना छोट्या ओबीसी समाजाच्या वाट्याला ३ टक्के उमेदवारीही आली नाही. छोट्या राज्यात मतदारसंघ छोटे होऊन लहान समाजाचे महत्त्व वाढेल आणि त्यांना न्याय मिळू शकेल, असे सांगून अँड. प्रकाश आंबेडकर यांनी वेगळ्य़ा विदर्भाच्या मागणीचे सर्मथन केले.
** व्यवस्थेतील वाईट वृत्तीच्या गळाला आपलेही मासे लागलेत!
सध्याची राजकीय व्यवस्था वाईट वृत्तीच्या माणसांनी भरली आहे. या वाईट वृत्तीच्या गळाला आपलेही काही मासे लागले आहेत. सध्या ह्यपाकीट संस्कृतीह्ण बोकाळली आहे. तिला आळा घालण्याची वेळ आली आहे. चोरांच्या उलट्या बोबां सुरू असून, त्याचे उट्टे काढण्याची वेळ आली असल्याचे सूचक वक्तव्य करून अँड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षांतील बंडखोरांना धडा शिकविण्याचा इशारा दिला.