भाजपात बरीच ‘बॉम्बाबॉम्ब’ व्हायची आहे
By Admin | Updated: November 12, 2015 02:54 IST2015-11-12T02:54:00+5:302015-11-12T02:54:00+5:30
भाजपात लालकृष्ण अडवाणी यांचा लेटरबॉम्बच नाही तर अजून बरीच बॉम्बाबॉम्ब व्हायची आहे, असे भाकित शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

भाजपात बरीच ‘बॉम्बाबॉम्ब’ व्हायची आहे
ठाणे : भाजपात लालकृष्ण अडवाणी यांचा लेटरबॉम्बच नाही तर अजून बरीच बॉम्बाबॉम्ब व्हायची आहे, असे भाकित शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. बिहारमध्ये शिवसेनेला अपेक्षित यश मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.
कल्याण-डोंबिवली महापौर निवडणुकीकरिता येथे आलेल्या ठाकरे यांनी भाजपामध्ये धुमसत असलेल्या असंतोषावर बोट ठेवले व असंतोष आणखी उफाळून येईल, असे संकेत दिले. बिहारच्या निवडणुकीत भाजपाला बसलेला फटका व त्यानंतर भाजपामधील ज्येष्ठ नेत्यांनी लिहिलेले पत्र याबाबत लागलीच काही बोलणार नाही. नितीश कुमार यांच्या शपथविधीला जायचे की नाही, हे अद्याप ठरवलेले नाही. पण, ते मुंबईत आले किंवा मी बिहारला गेलो तर आम्ही जरूर भेटू, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महामंडळांवरील नियुक्त्या यामध्ये भाजपाने मित्रपक्षांना सामावून घ्यावे आणि याचा विचार मोठ्या भावाने करावा, अशी मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)