महाराष्ट्राच्या राजकारणात, सध्या ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात का? यावर जोरदार चर्चा सुरू आहे. एवढेच नाही, तर सोशल मीडियावरही यासंदर्भात चर्चा बघायला मिळत आहे. हाच धागा धरत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी, "अजित दादांच्या छत्रछायेखाली, तुतारी गट असाच एकत्र येण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचाही भविष्यात नक्कीच विचार केला जाईल, असे म्हणत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षला अप्रत्यक्षपणे खुली ऑफरच दिली आहे.
काय म्हणाले, मिटकरी? "जर ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल, तर निश्चितच स्वागतार्ह आहे. काहीही म्हटले, तरी राज ठाकरे साहेबांचा पक्ष शिवसेना ठाकरे गटापेक्षा लहानच आहे आणि लहानांनी मोठ्याकडे जाणे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरूनच म्हणता येईल. काल यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच, तुतारी गटाच्या एका नवीन आमदाराने ट्विट केले होते आणि म्हटले होते की, 'असे सर्व पक्ष एकत्र यायला हवेत.' मी त्यांच्या या म्हणण्याचे स्वागत करतो. आदरणीय अजित दादांच्या छत्रछायेखाली, जर तुतारी गट असाच एकत्र येण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचाही भविष्यात नक्कीच विचार केला जाईल," असे म्हणत, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला अप्रत्यक्षपणे खुली ऑफरच दिली आहे.
मिटकरी पुढे म्हणाले, "पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे पुरोगामी विचारांशी, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्याशी राहिलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आणखी बळकट होण्याकरता, जर तुतारी गटाला असे वाटत असेल की आपण दादांच्या नेतृत्वात पुढची वाटचाल करावी, तर नक्कीच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा त्यासंदर्भात ठरवतील." तसेच, "पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बेरजेचे समीकरण करणे, बेरजेचे राजकारण करणे, हे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटते. त्यामुळे निदान नाही कुणाकडून, पण राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने हा आदर्श घ्यायला हरकत नाही." मिटकरी एबीपी माझासोबत बोलत होते.