‘इतरांवर’ निर्बंध नाहीत
By Admin | Updated: October 20, 2016 05:07 IST2016-10-20T05:07:29+5:302016-10-20T05:07:29+5:30
‘निवडणुका होत असलेल्या नगरपालिकांच्या क्षेत्रातच आचारसंहिता राहणार

‘इतरांवर’ निर्बंध नाहीत
मुंबई : ‘निवडणुका होत असलेल्या नगरपालिकांच्या क्षेत्रातच आचारसंहिता राहणार असून, त्या जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन विकास कामे करण्यावर कोणतेही निर्बंध नसतील,’ असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
आयोगाने आज आचारसंहितेबाबत पत्रक प्रसिद्धीला दिले. त्यात स्पष्ट केले आहे की, निवडणूक होत असलेल्या नगरपालिका, नगर पंचायतींमधील मतदारांना प्रभावित करतील, असे कोणतेही निर्णय शासनाला घेता येणार नाहीत, तसेच नगरपालिका वा नगर पंचायतींमध्ये मतदारांवर प्रभाव टाकतील, अशी कोणतीही कृती किंवा घोषणा त्यांना स्वत:ला वा कुठल्याही महापालिका, जिल्हा परिषदा, मंत्री, आमदार, खासदार यांना करता येणार नाहीत. चार किंवा त्यापेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये निवडणूक असेल, तर संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता असेल, असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे. तथापि, त्याचा अर्थ त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिकांच्या माध्यमातून नवीन निर्णय घेता येणार नाहीत, असा होत नसल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे. आचारसंहितेत कोणतीही ढिल दिलेली नाही. काल जाहीर केलेल्या आचारसंहितेबाबत अधिक स्पष्टता यावी, म्हणून आज पत्रक प्रसिद्धीला दिले आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)