विदर्भातल्या माणसांसारखी माणसे कुठेच नाहीत
By Admin | Updated: July 21, 2014 00:58 IST2014-07-21T00:58:46+5:302014-07-21T00:58:46+5:30
नागपूरशी माझा ऋणानुबंध फार जुना आहे. मी काम करीत असताना मला पुरस्कार विदर्भाने दिला. पुण्यात मात्र रिटायर्ड होण्याची खात्री झाल्याशिवाय कुणी पुरस्कार देत नाही.

विदर्भातल्या माणसांसारखी माणसे कुठेच नाहीत
कुमार सप्तर्षी : गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार प्रदान समारंभ
नागपूर : नागपूरशी माझा ऋणानुबंध फार जुना आहे. मी काम करीत असताना मला पुरस्कार विदर्भाने दिला. पुण्यात मात्र रिटायर्ड होण्याची खात्री झाल्याशिवाय कुणी पुरस्कार देत नाही. कमलाताई होस्पेट, भाऊ समर्थ, जांबुवंतराव धोटे, राम शेवाळकर, दिनकर मेघे यांच्यासारख्यांनी मला इथे खूप प्रेम दिले आहे. नाते जपणारा आणि नात्यांवर प्रेम करणारा हा प्रदेश आहे. इथले आदरातिथ्य आणि आग्रह मी अनुभवले आहे. असे नमुने इतरत्र कुठेही मिळतच नाहीत. विदर्भातल्या माणसांसारखे लोक दुसरीकडे नाहीच, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणेचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी रविवारी व्यक्त केले.
सी. मो. झाडे फाऊंडेशनतर्फे संचालित सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराने डॉ. कुमार सप्तर्षी यांना गौरवान्वित करण्यात आले. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. एक लाख रुपयांचा धनादेश, शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम साई सभागृह, शंकरनगर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि खा. विजय दर्डा तर प्रमुख अतिथी म्हणून न्या. व्ही. एस. सिरपूरकर, ज्येष्ठ गांधीवादी अॅड. मा. म. गडकरी, सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे चेअरमन सत्यनारायण नुवाल, सी. मो. झाडे फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे, उर्मिला सप्तर्षी, सी. मो. झाडे फाऊंडेशनच्या सचिव भारती झाडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित होते. सप्तर्षी म्हणाले, कार्यकर्त्याची बूज राखण्याचे आणि त्याला प्रोत्साहन देण्याचे काम महाराष्ट्रातच होते. त्यामुळेच म. गांधी गुजरात सोडून येथे आले. या पुरस्काराने कार्यात सातत्य राखण्याची प्रेरणा मिळाली. याप्रसंगी केंद्राला सहकार्य करणाऱ्या नयना धवड, ज्ञानेश्वर रक्षक, सुधाकर त्रिफळे, डॉ. अशोक दाबेकर, राजाभाऊ चिटणीस, रवींद्र सातपुते, दीपक रंगारी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नितीन गडकरी म्हणाले, आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांची बूज राखण्यासाठी डॉ. सप्तर्षी यांनी प्रवाहाविरोधात काम केले. जयप्रकाश नारायण यांनीही समाज परिवर्तनासाठी मोठे काम केले. आजही सप्तर्षी यांचे कार्य सुरू आहे. त्यांना हा पुरस्कार देताना समाधान वाटते, असे ते म्हणाले.
खा. विजय दर्डा यांनी सप्तर्षी यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांनी महाराष्ट्राचे नाव देशात उंचावले, असे सांगितले. सातत्याने चळवळीत काम करून नवा महाराष्ट्र घडविला. गडकरींमध्ये विचार करण्याची चांगली क्षमता आहे. गडकरींकडून विदर्भ महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवकांना रोजगार देण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. आयकर बंद करण्याची संकल्पना गडकरींनी प्रत्यक्षात आणावी, असे आवाहन विजय दर्डा यांनी यावेळी केले. सिरपूरकर यांनी सप्तर्षींचा गौरव केला. नागपूर दिलदार माणसांचे शहर आहे; त्यामुळेच येथे सर्व पक्षांचे लोक एकमेकांचे मित्र आहेत, असे ते म्हणाले. प्रास्ताविक विकास झाडे यांनी केले. अखेर सावनेरच्या मूक-बधिर विद्यार्थ्यांनी वंदेमातरम् गीतावर नृत्य सादर केले.कार्यक्रमाचे संचालन धनंजय तांबेकर यांनी, आभार बळवंत मोरघडे यांनी मानले. (प्रतिनिधी)