मग त्यांनी शिव्याशाप दिले तर काय चुकले?

By Admin | Updated: February 1, 2015 01:02 IST2015-02-01T01:02:51+5:302015-02-01T01:02:51+5:30

आपल्या नशिबात आलेले भोग मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून वनिताबाईने त्याला शाळेत घातले़ परवा पोलिसांनी शेकडो वारांगनांना गंगाजमुनातून बाहेर काढले़ त्यात वनिताबाईसुद्धा होती़ ती कुठे गेली

Then what they missed if they cursed? | मग त्यांनी शिव्याशाप दिले तर काय चुकले?

मग त्यांनी शिव्याशाप दिले तर काय चुकले?

तुम्ही पाटी आणि पोळी हिसकावली !
गजानन जानभोर
आपल्या नशिबात आलेले भोग मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून वनिताबाईने त्याला शाळेत घातले़ परवा पोलिसांनी शेकडो वारांगनांना गंगाजमुनातून बाहेर काढले़ त्यात वनिताबाईसुद्धा होती़ ती कुठे गेली माहीत नाही. मुलगाही आता शाळेत येत नाही. मायलेकरं कुठेतरी आश्रयाला गेले असतील़ उद्ध्वस्त झालेल्या गंगाजमुनाचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण़. अशा शेकडो वनिता आणि त्यांची मुले आता तेथून निघून गेली आहेत़.
वेश्या व्यवसाय हा अनैतिक आणि ती विकृतीच. त्याचे समर्थन करता येत नाही. सुसंस्कृत समाजात त्याला मान्यताही नाही. हा देहव्यापार बंद व्हायलाच हवा. परंतु या वारांगनांना गंगाजमुनातून बाहेर काढताना त्यांच्या निष्पाप मुलांची पाटी-पेन्सिल आपण कायमची हिसकावली, ही गोष्ट आपल्याला अस्वस्थ का करीत नाही़? आपल्या आईला या नरकातून बाहेर काढण्यासाठी हीच प्रकाशवाट योग्य आहे, असे मनोमन वाटणारी ही मुले रोज शाळेत जायची़. या अंधाऱ्या कोठडीतील भयाण वास्तव त्यांना अस्वस्थ करायचे. आपण शिकून मोठे होऊ, कामधंद्याला लागू आणि मग आपली आई हा देहव्यापार बंद करेल, असे या मुलांना वाटत असेल आणि त्यासाठी त्यांनी शाळेची वाट धरली असेल तर त्यांना मध्येच थांबवायचे की बोट धरुन पुढे घेऊन जायचे, या प्रश्नाचे उत्तर कोण देणार?
या दुष्टचक्रातून आपल्या आईला बाहेर काढण्याची एकमेव आशा त्यांना शिक्षणातून दिसू लागली होती़ ही वस्ती तशी बदनाम अन् समाजही तिच्याकडे तुच्छतेनेच बघतो़ शाळेपासून कायमची दुरावलेली ही मुले आता कुठे असतील? या मुलांचे पुढे काय होणार, असे असंख्य प्रश्न यानिमित्ताने उभे ठाकले आहेत. यातील काही मुले उद्या गुंड आणि मुली वेश्या झाल्या तर त्याची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी कोण स्वीकारणार? एक गंगाजमुना उद्ध्वस्त करताना आपण अशा असंख्य गंगाजमुनांना जन्म देत आहोत, याचे भान पोलिसांना राहिले नाही. या नरकात कोणतीही स्त्री आनंदाने, आवडीने येत नाही़ छंद म्हणूनही त्या या व्यवसायात आलेल्या नाहीत़ कुणाचा नवरा मेला, कुणाला कुटुंबाने वाऱ्यावर सोडले तर कुणी पोटाची भूक शमविण्यासाठी या दुष्टचक्रात अडकली. या वस्तीतील प्रत्येकीची स्वत:ची ही अशी एक ‘कहानी’ आपण ती कधीच समजून घेत नाही, घ्यावीशीही वाटत नाही.
वेश्या व्यवसाय खरच बंद करायचा असेल तर या व्यवसायातील महिलांचे पुनर्वसन, समुपदेशन, त्यांच्या मुलांचे शिक्षण या गोष्टींचाही सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा़ हा व्यवसाय पोलिसी खाक्याने किंवा दडपशाहीने कधीच बंद होणार नाही़. हे जग सोडून आपण दुसऱ्या जगात जायला हवे असे त्यांना स्वत:हून वाटले पाहिजे. पोलिसांच्या कारवाईमुळे हा देहव्यापार खरंच बंद झाला का? नाही! तो अजूनही सुरूच आहे़ फक्त त्याची जागा बदलली आहे आणि ती विखुरली आहे़
वेश्या व्यवसायातील स्त्रीचे पुनर्वसन ही मोठी सामाजिक समस्या आहे. एखादी स्त्री यातून बाहेर पडू इच्छित असेल तर समाज तिला स्वीकारत नाही. १९८४ ची गोष्ट आहे, गंगाजमुनातील एका वारांगनेच्या पुनर्वसनासाठी सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ इंगोले यांनी पुढाकार घेतला़ काही मित्रांच्या मदतीने रामभाऊंनी तिला आकाशवाणी चौकातील जुन्या पेट्रोल पंपाजवळ चहाची टपरी टाकून दिली़ पूर्वीपेक्षा दोन पैसे अधिक व सन्मानाने मिळत असल्याने सुरुवातीचे चार-पाच दिवस ती महिला आनंदित होती़. एक दिवस गंगाजमुनातील एक जुना ग्राहक तिथे आला. त्याने तिला ओळखले़. हळूहळू चौकातील लोकही तिच्याकडे तुच्छतेने बघू लागले. तिची चहाची टपरी नंतर ओस पडू लागली़ तिसाव्या दिवशी त्या स्त्रीचे पाय गंगाजमुनाकडे परत वळले़... परवा गंगाजमुनातून विस्थापित झालेल्या वारांगनांनी स्वत:च्या पायावर उभे राहायचे ठरवले तर त्यांचीही अवस्था त्या स्त्री सारखीच होईल़
गंगाजमुनातील मुले किमान शाळेत तरी जायची़ नव्या ठिकाणी तर आता तेही होणार नाही़ जन्मापासून जगण्याची झुंज द्यावी लागणाऱ्या या मुलांचे आयुष्य तसेही करपणार आहे. एकाचवेळी पाटी आणि पोळी हिसकावून घेतलेले हे दुर्दैवी जीव तळतळाट करीत असतील, शिव्याशाप देत असतील तर त्यांचे काय चुकले?

Web Title: Then what they missed if they cursed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.