...तर वर्षा बंगल्यावर बुलडोझर फिरवू
By Admin | Updated: July 7, 2016 03:15 IST2016-07-07T03:15:31+5:302016-07-07T03:15:31+5:30
दादरच्या आंबेडकर भवनाचा वाद दोन आंबेडकरी गटांतील आहे, अशी जाहीर भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तर मुख्यमंत्र्यांच्या मलबार हिल येथील वर्षा बंगला मी बुलडोझर

...तर वर्षा बंगल्यावर बुलडोझर फिरवू
मुंबई : दादरच्या आंबेडकर भवनाचा वाद दोन आंबेडकरी गटांतील आहे, अशी जाहीर भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तर मुख्यमंत्र्यांच्या मलबार हिल येथील वर्षा बंगला मी बुलडोझर फिरवून उद्ध्वस्त करीन, असा इशारा बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. तसेच आंबेडकर भवन पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड आणि अन्य ट्रस्टींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी १५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आंबेडकर भवनचा वाद हा रत्नाकर गायकवाड आणि आंबेडकर बंधू या दोन गटातील आहे, असे सरकारमधील मंत्री खासगीत म्हणत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची ही भूमिका जाहीर करावी. मग मीही मुख्यमंत्री पदासाठी माझा फडणवीस यांच्याशी वाद आहे, अशी भूमिका घेईन आणि या वादाचे कारण देत मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा या बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यास मोकळा असेन, असे धक्कादायक विधान आंबेडकर यांनी या पत्रकार परिषदेत केले.
ज्यांच्यावर वैयक्तीक आरोप करता येत नाहीत, ज्या पक्ष, नेते, संघटना यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकवून संपवता येत नाही, त्यांच्या चळवळीची केंद्रे उध्वस्त करण्याचे कारस्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने आखलेले आहे. २५ जूनच्या मध्यरात्री पाडण्यात आलेले दादरचे आंबेडकर भवन त्याच प्रवृत्तीचा भाग आहे, अशी खरमरीत टीकाही आंबेडकर यांनी यावेळी केली.
आंबेडकर भवन पाडताना पालिकेच्या सामान्य नियमांचेही पालन करण्यात आले नाही. वीज मीटर चोरुन नेले, वीज बेकायदा तोडण्यात आली, इमारतीत झोपलेल्या लोकांंना इशारा दिला नाही, असा आरोप आंबेडकर यांनी केला. यासंदर्भातील सर्व पुरावे मी स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून दिले. मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर कारवाईचे आदेश दिले. मात्र दोषींवर अद्याप काहीही कारवाइ झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेपूर्वी महाराष्ट्र लोकशाही डावी आघाडीतील घटक पक्षांची बैठक झाली. त्यास कॉ. प्रकाश रेड्डी, मिलिंद रानडे, भीमराव बनसोड, कॉ. किशोर ढमाले, प्रा. प्रतिमा परदेशी, डॉ. भारत पाटणकर, आदी हजर होते. (प्रतिनिधी)
१५ जुलैला डाव्या आघाडीचा मोर्चा
१५ जुलै रोजी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा डाव्या लोकशाही आघाडीतील घटक पक्षांतर्फे काढण्यात येणार आहे. हा मोर्चा कोणत्या पक्षाचा नसून लोकांचा मोर्चा असेल, असेही आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितले.