अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीत होणाऱ्या अधिवेशनात काय भूमिका मांडणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. दरम्यान, भुजबळांच्या नाराजीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर मी भुजबळांसोबत दोन तास बसून होतो, असे सांगत त्यांनी सविस्तर उत्तर दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल भाष्य केले.
"छगन भुजबळ आणि आमच्यामध्ये कुठलाही दुरावा नाहीये. आमच्या चर्चा होत राहतात. कालही (१७ जानेवारी) मी मुंबईत दोन तास छगन भुजबळ यांच्यासोबत दोन तास बसून होतो. आमच्यात कुटुंबात आपसात काही मुद्दे असतील, तर त्यातून आम्ही मार्ग काढू", अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
"छगन भुजबळ आमच्या पक्षाचे सर्वात ज्येष्ठ आणि महत्त्वाचे सदस्य आहे. त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे. महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत आणि देशातही ओबीसी समाजासाठी त्यांनी खूप काम केलं आहे", असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
"असे वाटले तर आम्ही दुरुस्ती करू"
"छगन भुजबळ आणि आमच्यात कोणतीही चर्चा असेल, १९-२० किंवा जसे तुम्ही सांगत आहात, त्याप्रमाणे; आम्हाला असे काही आहे असे वाटत नाही, पण आम्ही त्यात दुरुस्ती करू. छगन भुजबळ हे अधिवेशनाला येतील. आमचं त्यांच्याशी बोलणं झालं आहे. पंकज भुजबळ, समीर भुजबळ हेही पक्षाचे सदस्य आहेत, तेही येणार आहेत", अशी भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडली.