...तर संस्कृतीच्या प्रवाहित्वाला बाधा

By Admin | Updated: March 1, 2017 04:02 IST2017-03-01T04:01:59+5:302017-03-01T04:02:20+5:30

विचारसाहित्य नसल्याने बंदिस्त वातावरणात अडकल्यामुळे तयार झालेले समूह आहेत.

... then the flow of culture | ...तर संस्कृतीच्या प्रवाहित्वाला बाधा

...तर संस्कृतीच्या प्रवाहित्वाला बाधा


डोंबिवली : सध्याचे अल्पसंख्याक त्यांच्या संख्येमुळे नाहीतर त्यांना विचारसाहित्य नसल्याने बंदिस्त वातावरणात अडकल्यामुळे तयार झालेले समूह आहेत. शासन संस्था ही खुल्या विचारांचे दमन करणारी संस्था झाली, तर चाकोरी मोडणारे विचार अथवा गट एकत्र येऊ न देण्याचा प्रयत्न होईल. ही गोष्ट संस्कृतीच्या प्रवाहित्वाला बाधा आणणारी असेल, असे मत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील समकालीन संस्कृती अभ्यास के ंद्राचे प्रमुख नागेश व्यंकट बाबू यांनी व्यक्त केले.
पेंढरकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे शनिवारी राष्ट्रीय स्तरावरील ‘भाषा, साहित्य, स्त्रीवाद आणि संस्कृती यामधील समकालीन प्रवाह’ या विषयावरील परिषद झाली. त्याची सुरुवात बाबू यांच्या बीजभाषणाने झाली. या वेळी ते बोलत होते.
बाबू म्हणाले, भौतिक वास्तव व आभासी वास्तव यातील सीमारेषा पुसट होत आहे. जे वास्तव आहे, असे आपल्याला वाटते, ती कदाचित तंत्रज्ञानाची करामत असू शकते. आपले अस्तित्व काही साक्षीपुराव्यांनी सिद्ध होत असते. पण, हे साक्षीपुरावेच संगणकीय तंत्रज्ञानाद्वारे बनावटी होत जाण्याची भीषण शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
मंजुनाथ महाविद्यालयाच्या प्रा. सुशीला विजयकुमार यांनी ‘भाषा व संप्रेषण’ या विषयाचा आढावा घेताना विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्ये विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी निरनिराळ्या शब्दांचे भावार्थ अभिनयाद्वारे वा प्रसंगी भ्रमणदूरध्वनीच्या मदतीनेही शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो, असे सांगितले. वर्तक महाविद्यालयातील प्रा. दीपा कात्रे म्हणाल्या, सुधा मूर्ती यांच्या लिखाणाची मुळे स्त्रीवादी साहित्यामध्ये सापडतात. संपूर्ण देशभर भ्रमण करणाऱ्या सुधा मूर्ती यांनी निरनिराळ्या स्त्री व्यक्तिरेखांचे रेखाटलेले भावविश्व त्यांच्या निरीक्षणातून व संवदेनशीलतेतून निर्माण झाले आहे.
प्रा. दिनेशकुमार नायर यांनी सांगितले, सध्याचे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे. निरनिराळ्या समाजमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या संदेशांमुळेही भाषा साहित्य जिवंत राहू शकते. त्यामुळे सध्या लिखाणाची मूळ आवृत्ती कोणती आणि त्याची नक्कल कोणती, हे ओळखणे कठीण होत चालले आहे. अर्थात, शरीराचा नाश झाला तरी आत्मा जिवंत राहतो. हे सत्य भाषा साहित्यालाही लागू पडते, असे सांगितले.
प्रा. सचिन एन. यांनी आपल्या ‘खैरलांजी, सैराट आणि मराठी माणूस’ या लेखनाचा संदर्भ घेत जातीवर आधारित भेदभाव नष्ट करण्यासाठी चिकित्सकतेची, स्वत:लाच पृच्छा करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी मांडले.
विल्सन महाविद्यालयातील डॉ. मिशेल फिलीप यांनी सध्या प्रसारमाध्यमांद्वारे निर्माण होत असलेल्या व आपल्यावर लादल्या जात असलेल्या नवीन वास्तवाचा मात्र आपण मूकपणे स्वीकार करीत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रास्ताविक प्राचार्या डॉ. अनुराधा रानडे यांनी केले. (प्रतिनिधी)
>विविध विषयांवर विचारमंथन : या परिषदेसाठी भोपाळ, दिल्ली, कानपूर इत्यादी प्रांतांमधून तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील महाविद्यालयांमधून ७५ प्राध्यापक उपस्थित होते.भाषा, साहित्य तसेच स्त्रीवाद व संस्कृती या विषयांवरील सत्रामध्ये सुमारे ६० प्राध्यापकांनी आपले शोधनिबंध सादर केले. दिवसभर निरनिराळ्या महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन झाले.

Web Title: ... then the flow of culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.