..तर ‘आश्वासनांचा गणपती बाप्पा’ची स्थापना

By Admin | Updated: August 22, 2016 02:20 IST2016-08-22T02:20:34+5:302016-08-22T02:20:34+5:30

विनाअनुदानित शिक्षक संघटनांनी बहुतेक शिक्षण उपसंचालक कार्यालयांत ‘आश्वासनांचा गणपती बाप्पा’ची प्रतिष्ठापना करण्याची घोषणा केली

..then the establishment of the assurances 'Ganapati Bappa' | ..तर ‘आश्वासनांचा गणपती बाप्पा’ची स्थापना

..तर ‘आश्वासनांचा गणपती बाप्पा’ची स्थापना


मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शिक्षक संघटनांनी बहुतेक शिक्षण उपसंचालक कार्यालयांत ‘आश्वासनांचा गणपती बाप्पा’ची प्रतिष्ठापना करण्याची घोषणा केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांना गणेशोत्सवापूर्वी अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र दिलेले आश्वासन ते पाळत नसल्याने गणपती बाप्पा त्यांना या वेळी सुबुद्धी देवो, असे साकडे गणपतीला घालणार असल्याचे आंदोलन प्रमुख मनोज पाटील यांनी सांगितले.
शिक्षकांनी अनुदानासाठी केलेल्या तीव्र आंदोलनात गजानन खरात या शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तावडे यांनी गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांना अनुदान मिळेल, असे आश्वासन दिलेले आहे. मात्र म्हणावी तितकी तत्परता अद्याप दिसत नाही आहे. परिणामी, जिल्हास्तरावर नैराश्यग्रस्त शिक्षकांनी एकत्रित येऊन ‘आश्वासित शिक्षक गणेश मंडळां’ची स्थापना केला आहे.
आश्वासित मंडळातर्फे राज्यातील प्रत्येक शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर तीन दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाईल. शिवाय जिल्हा स्तरावर त्या-त्या संघटनांनी आत्तापर्यंत केलेल्या उपोषण, मोर्चा आणि धरणे आंदोलनांच्या छायाचित्रांचा वापर संबंधित मंडळ आरास म्हणून करेल. शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनांमुळे बहुतेक शिक्षक पडेल ते काम करीत आहेत. यासंबंधातील विडंबनात्मक सजीव देखावे काही ठिकाणी सादर करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>प्रसादाला गाजर, रताळे, केळी!
आश्वासित शिक्षक गणेश मंडळातर्फे शिक्षणमंत्री ज्या जिल्ह्यात असतील, त्या ठिकाणी त्यांना आरतीसाठी निमंत्रित केले जाईल. शिवाय प्रसाद म्हणून मंत्री महोदयांना गाजर, रताळे आणि केळी दिली जातील. शिक्षणमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नसल्याने हा विडंबनात्मक प्रसाद वाटावा लागणार असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.
>अनुदान कशाला?
गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून विनाअनुदानित शिक्षक शाळांवर अध्यापनाचे काम करत आहेत. शासनाने केलेल्या मूल्यांकनानंतर अनेक शाळा, तुकड्या या अनुदानास पात्र झाल्या आहेत. मात्र ते देण्यास शासन व शिक्षणमंत्री जाणूनबुजून दिरंगाई करत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. अनुदानाअभावी शालेय पोषण आहार व पाठ्यपुस्तकांपासूनही विद्यार्थी वंचित आहेत. तर अनेक शिक्षकांना उदरनिर्वाहासाठी अध्यापनाव्यतिरिक्त मोलमजुरीची कामे करून कुटुंबाचा चरितार्थ चालवावा लागत आहे.

Web Title: ..then the establishment of the assurances 'Ganapati Bappa'