...तर गणपतीत ‘काम बंद’चा चालकांचा इशारा
By Admin | Updated: July 1, 2015 00:09 IST2015-07-01T00:09:52+5:302015-07-01T00:09:52+5:30
एसटी महामंडळात तीन वर्षांपूर्वी भरती झालेल्या कनिष्ठ चालकांना त्यांच्या मूळ विभागात अद्यापही रुजू न केल्याने त्याच्या निषेध करीत ७२७ चालकांनी मंगळवारी मोर्चा काढला.
...तर गणपतीत ‘काम बंद’चा चालकांचा इशारा
मुंबई : एसटी महामंडळात तीन वर्षांपूर्वी भरती झालेल्या कनिष्ठ चालकांना त्यांच्या मूळ विभागात अद्यापही रुजू न केल्याने त्याच्या निषेध करीत ७२७ चालकांनी मंगळवारी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केले. चालकांना मूळ विभागात रुजू न केल्यास गणेशोत्सव काळात काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. परळ कामगार मैदान ते मुंबई सेंट्रल असा हा मोर्चा काढण्यात आला.
एसटी महामंडळाने २0१२ साली चालक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही भरती त्या त्या विभागांकरिता होती. यात नगर, लातूर, सोलापूर, अमरावती, सातारा, धुळे, नाशिकमधील चालकांचा समावेश होता. २0१२ साली चालकांची भरती झाल्यानंतर २0१४ साली या चालकांची बदली चालकांची टंचाई असलेल्या मुंबई व कोकण विभागात करण्यात आली. त्यानंतर या चालकांना त्यांच्या विभागात पुन्हा रुजू करण्यात आले नाही. चालकांची कधीही राज्याकरिता भरती झालेली नाही. तसेच यातील कोणत्याही चालकाने मुंबई किंवा कोकणात नोकरी मिळावी, असा अर्ज केलेला नाही. असे असतानाही महामंडळाचे अधिकारी चालकांना दिलेली नेमणूक बरोबर असल्याचा कांगावा करीत असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून सांगण्यात आले. महामंडळाच्या या कारभारामुळे ७२७ चालकांवर अन्याय झाला असून, ते भरती झालेल्या मूळ विभागात त्वरित बदली करावी, अशी मागणी युनियनकडून एसटी महामंडळाकडे या वेळी करण्यात आली. यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.