लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निवडणूक आयोगाला टीकेचं लक्ष्य करत आहेत. एकीकडे बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्येही मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप ते सातत्याने करत होते. दरम्यान, आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील मतदानामध्ये झालेल्या घोटाळ्याचे पुरावे सादर केले आहेत. या आरोपावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपावरुन राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
"महाराष्ट्रात मतदानांची चोरी झालेली नाही आणि देशात कुठेही मतदानांची चोरी झालेली नाही. मला वाटतंय राहुल गांधीच्या मेंदूची चीप चोरीला गेली आहे. त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे, म्हणून ते नेहमी खोटे बोलत आहेत, ते जनतेचे जनमत चोरत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली.
राहुल गांधी नेहमी आकडेवारी बदलत आहेत. ते खोटं बोलून आपली हार लपवत आहेत. त्यांना माहित आहे ते पुन्हा हरणार आहेत, असा टोलाही फडणवीस यांच्यावर लगावला.
राहुल गांधी नेहमी मतदार यादीत गोंधळ आहे मम्हणत आहेत आणि बिहारमध्ये मतदार यादी दुरुस्त करण्याचे काम सुरू आहेत त्यावर मात्र ते टीका करत आहेत. खोटे बोलून आपली हार लपवण्याचे काम राहुल गांधी करत आहेत, असा आरोपही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड
पत्रकार परिषदेमधून महाराष्ट्रातील मतदानामध्ये झालेल्या घोटाळ्याच्या पुराव्यांचं सादरीकरण करताना राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीमध्ये चोरी झाली. महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक हरलो. महाराष्ट्रामध्ये सुमारे ४० लाख मतदार रहस्यमय आहेत. येथे पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक नवे मतदार नोंदवले गेले. या मतदार यादीबाबत निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे. हे मतदार खरे आहेत की खोटे हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे.