एमबीबीएसच्या पेपरची चोरी

By Admin | Updated: May 24, 2014 00:59 IST2014-05-24T00:59:17+5:302014-05-24T00:59:17+5:30

मेयो : अंतिम वर्षाच्या परीक्षेवर संकट

Theft of MBBS paper | एमबीबीएसच्या पेपरची चोरी

एमबीबीएसच्या पेपरची चोरी

नागपूर : राज्यात २८ मे पासून सुरू होणार्‍या एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचे पेपर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेयो) चोरी झाले. गुरुवारी दुपारी ही घटना समोर येताच मेयोमध्ये खळबळ उडाली. या घटनेमुळे परीक्षेवरच संकट निर्माण झाले आहे. मेयो रुग्णालयाच्या परिसरात बहुउद्देशीय इमारत आहे. या इमारतीत परीक्षा हॉल आहे. येथील दोन आलमार्‍यांमध्ये प्रश्नपत्रिका ठेवल्या होत्या. २१ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत पेपर सुरक्षित होते. २२ मेच्या दुपारी १२ वाजता परीक्षेच्या कार्याशी संबंधित डॉ. अमित अग्रवाल यांना परीक्षा हॉलला लागलेले कुलूप तुटलेले दिसले. आत गेल्यावर आलमार्‍यांचेही कुलूप तुटलेले दिसले. आलमारीत ठेवलेले एमबीबीएस अंतिम वर्षाच्या पेपर्सचे सहा पॅकेटचे सील उघडले होते. डॉ. अग्रवाल यांनी लागलीच याची सूचना वरिष्ठांना दिली, त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. परीक्षा हॉलमध्ये दोन आलमार्‍या आहेत. यात प्रश्नपत्रिकेचे ३६२ पॅकेट ठेवण्यात आले होते. एमबीबीएसच्या अंतिम वर्षांमध्ये सहा पेपर असतात. आरोपीने केवळ ते सहा पॅकेटच फोडले. यावरून आरोपीला याची माहिती होती. पेपर २० मे रोजी नाशिकवरून आले होते. तेव्हापासून ते आलमारीमध्ये होते. २८ मेपासून परीक्षेला सुरुवात होणार होती. ऐनवेळी ही घटना झाल्यामुळे परीक्षेवर स्थगिती येण्याची किंवा नवीन पेपर येण्याच्या शक्यतेला घेऊन विद्यार्थी चिंतित आहे.सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा हॉलच्या सुरक्षेला घेऊन प्रशासन उदासीन होते. हॉलमध्ये लायब्ररीसह अनेक विभाग आहेत. येथे विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. डॉ. अमित अग्रवाल यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी चोरीचे प्रकरण दाखल केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Theft of MBBS paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.