जत : गोरगरीब जनता व स्थलांतरितांना लखपती बनविण्यात शंभर टक्के यशस्वी होणारी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) आहे. त्यामुळे आज जत तालुक्यात आम्ही राज्यातील पहिला रोजगार हमीचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यास सुरुवात करीत आहोत. नरेगातील २६६ योजनांचा लाभ येथील जनतेला घेता येईल. यातील अटी व शर्ती शिथिल करून योजनेचा लाभ देऊ. त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.जत येथे मनरेगाच्या पहिल्या प्रकल्पाची सुरुवात मंत्री गोगावले यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकल्प महासंचालक नंदकुमार वाघमारे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, राजेंद्र शहाळे, अजयकुमार नष्टे, रोहिणी शंकरदास, आनंदा लोकरे, डॉ. रवींद्र आरळी, ब्रह्मानंद पडळकर, सुनील पवार, सरदार पाटील, संजयकुमार तेली, आप्पासोा. नामद, आकाराम मासाळ आदी उपस्थित होते.
गोगावले म्हणाले, पहिल्यांदा हे खाते मला पसंत नव्हते. परंतु, ज्यावेळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या खात्याची कामे पाहिली, तेव्हा समजले. पहिल्यांदा नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करून कामांची पाहणी केली. मनेरगाच्या कामांतून थेट जनतेची कामे करता येतात. पडळकर यांच्या प्रयत्नामुळे मी हा प्रकल्प जत तालुक्यात घेऊन आलो.
जतला पहिल्या क्रमांकावर आणू..राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार असताना जत तालुक्याला सिंचनासाठी दोन हजार कोटी दिले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दोन हजार एकराची एमआयडीसी मंजूर केली आहे. आज आपण रोजगार हमीचा पहिला प्रकल्प करत आहोत. त्यामुळे आता जतच्या विकासाला राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही. मुख्यमंत्री यांनी हा तालुका पहिल्या क्रमांकावर आणण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे शिंदेसेनेकडे असणाऱ्या सर्व मंत्र्यांच्या विभागातला निधी आम्ही जतसाठी देऊ, असे आश्वासन गोगावले यांनी दिले.