Maharashtra News Marathi: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लोकप्रिय माझी लाडकी बहीण योजनेसह अनेक योजना सुरू केल्या होत्या. २१०० रुपये वाढवण्यासह इतर योजनांचा अर्थसंकल्पात कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. त्यांच्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात न आल्याने त्या योजना बंद होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावरूनच आज विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला लक्ष्य करत एकनाथ शिंदे यांना डिवचले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "लाडक्या बहीण योजनेवेळी पुढील दोन महिन्यांचे पैसे आगाऊ दिले. आणि सगळ्या बहिणींना फोन गेले. ताई, साडेसात हजार मिळाले. तुम्ही मते द्या. तुम्हाला २१०० रुपये देऊ, फोनवर सांगितले. जवळपास दीड कोटी महिलांना सांगितले. त्यामुळे आम्ही तीन हजार देतो म्हटले तरी ते उधारीवर आहेत. आम्ही नगदी देतोय. त्यामुळे आमच्या बहिणींनी यांच्या झोळीत भरभरून टाकलं. काम झालं. गरज सरो वैद्य मरो", अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
शिंदेंजी, तुम्ही चांगल्या योजना आणल्या
"२१०० रुपये देणार की नाही, याचा उल्लेख अर्थसंकल्पात दिसायला पाहिजे होता. पण, दुर्दैवाने सांगावं लागत शिंदे साहेब, तुम्ही ज्या-ज्या काही योजना आणल्या... चांगल्या योजना नव्हत्या का तुमच्या? छान योजना आणल्या तुम्ही. आम्हालाही वाटलं की काही बऱ्या योजना आहेत. सगळ्या तुमच्या योजना बंद करण्याचा निर्णय होतो", असे विजय वडेट्टीवार एकनाथ शिंदे यांच्याकडे बघत म्हणाले.
"तुम्ही आणलेल्या कोणत्या कोणत्या योजना मी वाचून दाखवतो. का बरं तुमच्याकडे दुर्लक्ष आहे, याची आम्हाला चिंता वाटतेय. खरं सांगतो तुम्हाला. तुम्ही ह्रदयातील माणसं आहात आमच्या. दोन वर्ष महाराष्ट्रात सुंदर काम केलं. दुर्दैव की, जे व्हायचं ते नशिबाने झालं", असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला.
शिंदेंच्या योजना या सरकारला चालतात की नाही?
"गुलाबी रिक्षा योजना आणली, त्याचा या अर्थसंकल्पात उल्लेख नाही. अन्नपूर्ण योजना... तीन सिलेंडर मोफत देणार होतात... त्या योजनेचं काय झालं, अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख नाही. म्हणजे झाली निवडणूक, गेले सिलेंडर खड्ड्यात. महिलांना फसवलं. शिवभोजन थाळी, सणांसाठी आनंदाचा शिधा, कुठे गेला आनंदाचा शिधा. आनंद कुणाला झाला होता, आम्हाला माहितीये. एक रुपयात पीकविम्याचा उल्लेख नाही. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, याचाही अर्थसंकल्पात उल्लेख नाही. तीर्थ पर्यटन योजना, याचा अर्थ असा की शिंदे साहेबांच्या योजना या सरकारला चालतात की नाही? शिंदे साहेबांनी सत्ता आणली आणि शिंदे साहेबांच्या योजनांना कात्री लावण्यात आली, असे चित्र दिसतंय", असे म्हणत विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीआधी सुरू करण्यात आलेल्या योजनांवरून महायुतीला सुनावले.