विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र भाजपला नव्या प्रदेशाध्यक्ष आणि विविध स्तरावरील अध्यक्षांच्या निवडीचे वेध लागले आहेत. आता तो दिवस जवळ आला आहे. भाजपची विविध स्तरावरील अध्यक्षपदांची लॉटरी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष निवडले जाणार असल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
भाजपाचे संघटन पर्व सुरू आहे. 1 कोटी 51 लाख सदस्य जोडण्याचे लक्ष्य असलेल्या भाजपाचे महाराष्ट्रात अभियान सुरू झाले आहे. कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आम्ही महाराष्ट्रात फिरत आहोत. अभियान पूर्ण होईल असा विश्वास आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिले पर्व असेल असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
तसेच 3 लाख कार्यकर्त्यांना सक्रीय मेम्बरशिप देत आहोत. बुथ अध्यक्ष आणि 12 पदाधिकारी देण्यात येणार आहेत. तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष निवडले जाणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
‘एक व्यक्ती, एक पद’ बावनकुळे यांना राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे महसूल मंत्रिपद देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनंतर चौथ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांना स्थान देण्यात आले. भाजपमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ असा नियम आहे. त्यानुसार बावनकुळे यांच्या जागी आता संघटनात्मक निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर रवींद्र चव्हाण हे पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष होतील. अलिकडील काही वर्षांमध्ये कोकणात भाजप मजबूत करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला नव्हता, तेव्हाच त्यांना प्रदेशाध्यक्ष करणार हे स्पष्ट झाले होते. चव्हाण हे डोंबिवलीचे (जि. ठाणे) आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.