लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदी काठच्या परिसराला फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली आहे.
फडणवीस यांनी पत्रात अलमट्टी धरणाचे बॅक वॉटर, नदीमधील गाळ साचणे, बंधाऱ्यांचे बांधकाम यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीबाबत नागरिकांच्या व्यथा-वेदना मांडल्या आहेत. सरकारने अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत सिम्युलेशन आणि हायड्रानॉमिक्स पद्धतीने अभ्यास करण्याचे काम रुरकीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीकडे सोपविले आहे. याबाबतचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही, तोवर या धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय विवेकी ठरणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.
कर्नाटक सरकारचा अलमट्टी जलाशयाची उंची ५१९.६ मीटरवरून ५२४.२५६ मीटर करण्याचा निर्णय आमच्यासाठी अत्यंत चिंताजनक आहे. अशी उंची वाढविली गेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीत आणि नागरिकांच्या हाल-अपेष्टांमध्ये भर घालण्यासारखेच होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.