लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्वी एक सरकार एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन करायचे. दुसरे सरकार आले तरी ते काम अर्धवट राहायचे आणि तिसरे सरकार त्या कामाचे लोकार्पण करीत असे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ‘वर्क कल्चर’ बदलवले. आता जे सरकार भूमिपूजन करेल तेच सरकार त्या प्रकल्पाचे उद्घाटन करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (महारेल) निर्मित नागपूर जिल्ह्यासह वर्धा, अमरावती, चंद्रपूर, धुळे, जळगाव आणि वाशिम या सात जिल्ह्यांतील सात रेल्वे उड्डाणपुलांचे एकाच वेळी लोकार्पण करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. रामदासपेठ येथील कृषी महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर आयोजित या लोकार्पण सोहळ्याला वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १० वर्षांत राज्यात पायाभूत सुविधांची कामे अभूतपूर्व झाली आहेत. यामुळे नागपूरसह राज्याचा चेहरामोहरा बदलला. सध्या देशात रस्ते, रेल्वे, मेट्रो, उड्डाणपूल आदी पायाभूत सुविधांची जी कामे सुरू आहेत. त्यात सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत.
एका वर्षात २५ पूल
- महारेलने राज्यात उड्डाणपूल बनवण्याचा एक नवीन रेकॉर्ड केला आहे. गतिशीलता काय असते, ते महारेलने दाखवून दिले आहे. पूर्वी १० वर्षांत २ पूल तयार व्हायचे. महारेलने एका वर्षात २५ पूल तयार केले आहेत.
- महारेलच्या माध्यमातून आणखी २०० पूल व अंडरपासची कामे करायची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
- महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, येत्या एप्रिल २०२५ पर्यंत राज्यात आणखी २५ रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे अंडर ब्रीजचे उद्घाटन करण्यात येईल.