मुंबई - सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला पोलिसांच्या अनन्वीत छळाला कंटाळून आत्महत्या कारावी लागली ही घटना पोलीस विभागाला लाज आणणारी आहे. गृहविभागावर फडणवीस यांचे नियंत्रण नाही, फलटणची घटना गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटावी आणि तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यातील घटनेप्रकरणी भाजपा महायुती सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे आहे पण आपल्या पोलीसांमध्ये गुंड, मवाली, बलात्कारी अशा दुर्जन प्रवृत्तींना मोकाट सोडून सज्जनांना त्रास देण्याची प्रवृत्ती बळावत आहे आणि त्याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. पोलिस विभागाचा कारभार पाहून फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे. पण घटना कितीही गंभीर घडली तरी फडणवीसांना त्याचे काहीही वाटत नाही. फलटणची घटना ही काही पहिली घटना नाही. स्वारगेट बस स्थानकात एसटी बसमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला त्यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी केलेले विधान तर निर्लज्जपणाचा कळस होते. रावेरमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली पण कारवाई होत नाही हे पाहून मंत्र्यालाच पोलिस स्टेशनमध्ये धरणे धरावे लागले. आका, खोक्या, ही देण फडणवीस यांनी महाराष्ट्राला दिली आहे. आता ते सारवासारव करतील, तो मी नव्हेच अशा अविर्भावात आम्ही हे केले.. ते केले अशा वल्गणा करतील पण ते जर खरेच धर्माला मानत असतील तर फलटणच्या घटनेतील नराधमांच्या मुसक्या आवळा असेही सपकाळ म्हणाले.
विरोधकांचे मोबाईल सर्विलन्सवर ठेवल्याच्या प्रकरणावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सत्तेतील मित्रपक्षांवर भाजपा पाळत ठेवत आहे. मोबाईल सर्विलन्सवर ठेवणे हे भाजपासाठी काही नवे नाही. भाजपा सरकारने याआधी पेगॅसेस सारखे प्रकार केले आहेत. राज्यात रश्मी शुक्ला या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने जवळपास ५० नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते पण फडणवीस पुन्हा सत्तेत येताच या शुक्ला यांना पोलीस प्रमुखपदी बढती देण्यात आली. आता भाजपावाले विरोधकांच्या बाथरुम, संडास मध्येही कॅमेरे लावायला मागेपुढे पहाणार नाहीत कारण ते संस्कृती व सभ्यतेच्या पुढे गेले आहेत, ही भाजपाची मोडस ऑपरेंडी आहे. पण चंद्रशेखर बावनकुळे हे लवकरच आपल्या विधानावर घुमजावही करतील, असा दावाही त्यांनी केला.
Web Summary : Congress accuses Fadnavis of Home Department failure after a doctor's suicide due to police harassment. They demand his resignation, citing rising crime and surveillance, blaming him for moral decay and inaction, demanding accountability.
Web Summary : पुलिस उत्पीड़न से डॉक्टर की आत्महत्या के बाद कांग्रेस ने फडणवीस पर गृह विभाग की विफलता का आरोप लगाया। उन्होंने बढ़ते अपराध और निगरानी का हवाला देते हुए उनके इस्तीफे की मांग की, उन्हें नैतिक पतन और निष्क्रियता के लिए दोषी ठहराया।