मुंबई - जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर येत्या सप्टेंबर महिन्यात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडणार आहे. या पदासाठी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी घोषित केली आहे. या निवडणुकीत पाठिंबा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आल्याचा शरद पवारांनी म्हटलं.
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उपराष्ट्रपतिपदासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून दोन ते तीन नावाची चर्चा केली. त्यानंतर सर्वांचं एकमत झालं. सत्ताधाऱ्यांकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत म्हणून सहकार्य करावे ही विनंती केली. तथापि मी ते शक्य नाही असं म्हटलं. कारण ते वेगळ्या विचाराचे आहेत. राऊतांशी बोलणं झालं असून त्यांचीही चर्चा झाली. त्यांचा आणि आमचा निर्णय एकच आहे. आम्ही आमचं बघतो त्यांनी काय करायचं ते ठरवतील, निकाल वेगळा लागेल. आम्ही सरकारचा विचार करत नाही. गेल्यावेळी ३०० खासदार रस्त्यावर उतरले. आम्हाला अटक करण्यात आली असंही त्यांनी सांगितले.
तसेच निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही. निवडणूक आयोग स्वतंत्र आहे मात्र त्यांनी त्यांची भूमिका जी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. निवडणूक आयोगाकडून आमची फार काही अपेक्षा नाही. राहुल गांधी यांनी हे सत्य समोर आणलं मात्र याची सुरूवात बिहारमधून झाली. आज बिहारमध्ये राहुल गांधींचा गौरव सुरू आहे. बिहार आर्थिकदृष्या अडचणीचं राज्य आहे. त्यांचे काही प्रश्न असतील मात्र राजकीयदृष्ट्या ते राज्य जागरूक आहे. आणीबाणच्या काळात पहिला संघर्ष बिहारमध्ये झाला होता. राहुल गांधी यांच्या माहितीत एका झोपडपट्टीत एका घरात १४० लोकं राहत असल्याचे समोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यातील मतदारयाद्यांचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे असंही शरद पवारांनी म्हटलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यातील पराभूत झालेल्या मतदार संघात मतदानाची झालेली चोरी उघडकीस आणणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे स्वतः पुढाकार घेऊन ही चोरी उघडकीस आणणार आहे. प्रत्येक मतदारसंघात १० ते १५ हजार नावे घुसवली जात आहे. सध्या आमच्याकडे दोन मतदारसंघातील वास्तव माहिती उपलब्ध आहे. राज्यात झालेल्या मतचोरीविरोधात जन आंदोलन उभारण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा पराभव कशाप्रकारे करण्यात आला याचा भांडाफोड करण्यात येईल असे मुख्य प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले.